Tarun Bharat

रस्ते अपघाताचे बळी !

Advertisements

एकविसाव्या शतकात भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जगभरात भारताचा विविधांगी गौरव होत आहे. दुसरीकडे रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यात आपल्याला यश येत नाही. आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे या विषयाला पुन्हा चालना मिळाली आहे. वास्तविक, कोणत्यातरी मोठय़ा अपघातानंतर मंथन होणे चुकीचे आहे. त्याआधीच प्रत्यक्ष कृतीच्यादिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. केंद्रीय भूपृ÷ वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात दरवषी दीड लाख लोक रस्ते अपघातात आपल्या प्राणास मुकतात. सुमारे साडेचार लाख नागरिकांना अपघातात जखमी झाल्याने जायबंदी व्हावे लागते. ही सरासरी काढली तर दररोज सुमारे 415 लोक अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. दरवषी या आकडेवारीत किंचित फरक पडत असला तरी हे आपल्या देशाला खचितच भूषणावह नाही. भारंभार गुळगुळीत रस्ते बांधणे आणि कमीतकमी वेळात आपल्या गंतव्यस्थानी पोचणे ही चांगली गोष्ट असली तरी वाहनचालकाचे आकलन, रस्ते सुरक्षेविषयीचे ज्ञान तोकडे असते. मोकळा आणि खड्डे नसलेला रस्ता म्हणजे वेगाने वाहन चालवण्याचा परवाना असा अनेक चालकांचा समज असतो. तो चुकीचा आहे हे अपघाताची आकडेवारी स्पष्ट करते. महामार्गांवर होणाऱया अपघातांच्या विविध कारणांमध्ये रस्त्याचा दर्जा हा एक प्रमुख घटक आहे. रस्तेबांधणीसाठी प्रगत अभियांत्रिकीचा विचार करायला हवा. सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, डांबर-खडीचा वापर करून बांधलेले रस्ते आणि वाहनांची वेग मर्यादा याचे विशिष्ट समीकरण आहे. वाहनाच्या चाकांचे रस्त्याशी होणारे घर्षण, टायरचा दर्जा, वाहनाचा वेग या सगळय़ा परस्परपूरक गोष्टी आहेत. याचे शिक्षण वाहनचालकाला द्यावे लागणार आहे. वाहन चालवण्याचा परवाना आज कसा मिळतो हे वेगळे सांगायला नको. चारचाकी वाहन न चालवता येणाऱया अनेक महाभागांकडे ते चालवण्याचा परवाना आहे, ही वस्तुस्थिती आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अपघातप्रवण स्थळे (ब्लॅकस्पॉट्स) निश्चित करणे आवश्यक आहे. महामार्गांवर अपघात जास्त होतात म्हणून त्यावरील अशी ठिकाणे नोंदवली पाहिजेतच, पण राज्यांतर्गंत घाट रस्ते, अरुंद मार्गांचीही नोंद करून वाहनचालकाला त्याविषयी अवगत करावे लागणार आहे. आपल्याकडे वाहन चालकाला सूचना देण्यासाठी ‘पुढे वळण आहे,’ ‘घाटरस्त्यास प्रारंभ’ किंवा तत्सम सूचनाफलक आढळतात. कित्येकदा ते पुसट आणि धूसर झालेले असतात. तथापि, केवळ अशा फलकांनी काम भागणार नाही. रस्त्यांच्या सुरक्षेमध्ये खड्डेमुक्ती महत्त्वाची आहे. दरवषी होणाऱया अपघातात सुमारे 4000 अपघात रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होतात, असे ध्यानात आले आहे. 2016 आणि 2017 मधील आकडेवारी तर आणखी मोठी आहे. 2016 मध्ये रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे 6424 आणि 2017 मध्ये 9423 अपघात झाले होते. फक्त पावसाळय़ानंतरच रस्त्यांवर खड्डे पडतात असे नाही. वर्षभर वाहतुकीमुळे खड्डे पडण्याची प्रक्रिया सुरूच असते. विशेषतः ज्या शेतजमिनींचे हस्तांतरण महामार्गासाठी झालेले असते, त्याची सुरक्षितता अधिक गरजेची असते. वाहनचालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात होतात हेही खरे आहे. वाहनाचा वेग प्रचंड ठेवल्यामुळे अनेकांचे नियंत्रण सुटते. परिणामी, अनेकांना जीव गमवावा लागतो किंवा आयुष्यभराचे अपंगत्वाला सामोरे जावे लागते. कित्येकजण मद्यप्राशन किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवतात. ते स्वतःबरोबरच इतरांच्या मृत्युला कारणीभूत ठरतात. आजमितीला भारतातील कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवणारा चालक मोबाईल फोनचा वापर करतोच. वाहन चालवताना मोबाईल कानाला लावून बोलणाऱयांमध्ये दुचाकी, चारचाकी अगदी प्रचंड मोठय़ा बारा चाकी वाहनचालकांचाही समावेश असतो. हिवाळय़ात किंवा पावसाळय़ात धुके असते. हवामान फारसे चांगले नसते. तरीही रात्रंदिवस वाहने चालवली जातात. हवामान खराब असेल तर वाहने सुरक्षित ठिकाणी थांबवली पाहिजेत, हे समजत असूनही ‘वायपर’ लावून चालक आपलेच घोडे पुढे दामटत राहतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. ‘ओव्हरटेक’, ‘सिग्नल तोडणे,’ ‘राँग साईड,’ ‘ओव्हरलोड वाहने,’ ‘ओव्हरस्पीडिंग’ अशा कारणांमुळे अपघात होतात. सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’ ही अत्यावश्यक बाब आहे, पण अनेकजण स्वतःच्या जीवाशी खेळत राहतात. रात्रभर वाहन चालवण्यामुळे मेंदूवर, शरीरावर ताण येतो, त्यातूनही अपघात होतो. याखेरीज ‘रोड हिप्नॉसिस’ म्हणजे रस्ता संमोहनामुळेही अपघात वाढतात, असे ध्यानात आले आहे. विशेषतः आमदार विनायक मेटे यांच्या वाहनचालकाला या संमोहनाचा त्रास झाल्याचे सांगितले जाते. ही एक वेगळय़ा प्रकारची संमोहित स्थिती आहे. यामध्ये वाहनचालकाचे डोळे उघडे असतात. तो रस्त्यावर पाहत असतो. पण त्याचा मेंदू अक्रियाशील असतो. तो जे पाहत असतो, त्याचे विश्लेषण त्याचा मेंदू करीत नाही, अशा स्थितीत अपघात होतो. अशा संमोहनात आपल्या वाहनाचा वेग किती आहे, समोरून कोणते वाहन येत आहे वगैरेचा थांग लागत नाही. त्यामुळे लांबचा प्रवास असेल तर दर अडीच-तीन तासांनंतर वाहनचालकाने वाहन बाजूला घेऊन पाणी पिणे, थोडी विश्रांती घेणे आणि मन शांत करणे गरजेचे असते. नियमित ड्रायव्हिंग करणाऱया वाहनचालकांना याचा अनुभव असतो. चालकाला डुलकी येऊन अपघात होणे वेगळे आणि डोळे उघडे ठेवून अपघात करणे वेगळे. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावरही परिणाम होतो. संयुक्त राष्ट्राने तर 2011 ते 2020 हे दशक रस्ते अपघातविरोधी कृती दशक जाहीर केले होते, पण त्याही काळात अपघातावर नियंत्रण ठेवता आलेले नाही. रस्ते डिझाईन, आपत्कालिन सेवा, वाहनचालकांचे आणि पादचाऱयांचेही शिक्षण, वाहनांचे डिझाईन अशा सगळय़ा गोष्टींचा बारकाईने विचार होण्याची गरज आहे. अपघात विम्याची गरज आहे, पण त्यामुळे अपघातांची संख्या कमी होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

Related Stories

तूंतें नमितों श्रीभगवंता

Patil_p

कोरोनातही राजकारण

Patil_p

आमची खटय़ाळ पिढी

Patil_p

‘ऑपरेशन लोटस’

Omkar B

काय सांगशील?

Patil_p

काँग्रेसची डुबती नैय्या चिदंबरम सावरणार काय?

Patil_p
error: Content is protected !!