ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप २०२४ ची निवडणूक एकटा लढवेल. राज्यात ४२ ते ४३ खासदार निवडणून आणेल. तसेच विधानसभा निवडणुकीतही विजयी उमेदवारांचा आकडा १६० ते १७० असेल, हे माझं विधान लिहून ठेवा, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी मिरवणुकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने मुंडे कार्यकर्त्यांनी आज बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर असणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच निषेधाच्या घोषणाही दिल्या. तर केंद्रीयमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, हल्लेखोर कोण आहेत? हे शोधावे लागेल. जर पंकजा ताईंवर खरे प्रेम करणारे हे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करून पंकजा ताईंची प्रगती रोखत आहेत. पक्ष त्या गोष्टीत हस्तक्षेप करणार नाही, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले.
आमच्या हातात दोन दिवसांसाठी ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना पाटील म्हणाले, ईडी हातात द्या! फडणवीस सुद्धा मतदान करतील हे राऊतांच वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे.
अपक्ष आमदारांमुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याचे संजय राऊत बोलत आहेत. तसेच अपक्ष आमदारांना टार्गेट केलं जात आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदारांना का नोकर समजता का? बोलवून दम देता, विकास निधी रोखण्याची भाषा करता. मी स्वतः याबाबत पिटीशन दाखल करणार आहे, असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.
आगामी निवडणुकांबाबत बोलताना पाटील म्हणाले, ये तो झाकी है २० तारीख अभि बाकी है, असं म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला. तसेच राज्यसभेच्या झटक्यातून महाविकासआघाडी योग्य निर्णय करेल, उद्या अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. राज्यसभेची मतं दाखवून निवडणूक होती. त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो. आता विधानपरिषदेची निवडणूक आहे. इथे तर गुप्त मतदान होते. त्यामुळे आम्हाला प्रतिसाद जास्त मिळेल, तसेच सद्सदविवेक बुद्धीला आम्ही अवाहन करतो. देवेंद्रजीना अनेकांनी हात दाबून, आम्ही तुमच्या सोबत असल्याच सांगितलंय, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.