प्रतिनिधी/ रुरकेला
विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱया दिवशी तीन वेळच्या विजेत्या नेदरलँड्सने आपल्या मोहिमेची सुरुवात शानदार शैलीत करताना मलेशियाचा 3-0 असा, तर ‘क’ गटातील अन्य एका सामन्यात न्यूझीलंडने चिलीचा 3-1 असा पराभव केला. दुसरीकडे, गतविजेत्या बेल्जियमने दक्षिण कोरियाचा 5-0 असा धुव्वा उडवला आणि दिवसाच्या शेवटच्या सामन्यात जर्मनीने ‘ब’ गटात जपानचा 3-0 असा पराभव केला.
दिवसाच्या सुरुवातीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या सॅम हिहाने 11व्या व 18 व्या मिनिटाला दोन गोल केले, तर सॅम लेनने नवव्या मिनिटाला आणखी एका फिल्ड स्ट्राइकसह आघाडी वाढविली. 49 व्या मिनिटाला कॉन्टार्डोकडून चिलीचा एकमेव गोल झाला. ‘क’ गटातील अन्य एका सामन्यात थिज व्हॅन डॅमने 19 व्या मिनिटाला गोल करून जागतिक क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. चार मिनिटांनंतर जीप जॅन्सेनने पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलामध्ये करण्यात यश प्राप्त केले, तर शेवटच्या सत्रात पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करून तेन बेन्सने नेदरलँड्सची आघाडी 3-0 वर नेली.
नेदरलँड्सने यापूर्वी 1973, 1990 आणि 1998 मध्ये विजेतेपद पटकावलेले आहे. गोल फरकामुळे ते न्यूझीलंडपेक्षा गटात अव्वल असून दोघांचेही विजयातून तीन गुण झाले आहेत. सोमवारी नेदरलँड्स आणि न्यूझीलंड भिडणार असून त्याच दिवशी मलेशियाची लढत चिलीशी होणार आहे.
बेल्जियमकडून धुव्वा
दिवसाच्या उत्तरार्धात विद्यमान विजेत्या बेल्जियमचा सामना दक्षिण कोरियाशी झाला. त्यात बेल्जियमने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 5-0 ने पराभूत करून दणक्यात सुरुवात केली. कोरियाने पहिल्या सत्रात गतविजेत्यांना सडेतोड उत्तर दिले होते. मात्र नंतर बेल्जियमने जोरदार पुनरागमन केले आणि 30 व्या मिनिटाला त्यांच्या हेंड्रिक्स अलेक्झांडरने पहिला गोल केला. 42 व्या मिनिटाला कोसिन्स टँग्युयच्या शानदार गोलाच्या जोरावर त्यांनी आपली आघाडी वाढवली, तर 44 व्या मिनिटाला आपला खेळाडू व्हॅनच्या माध्यमातून पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून आघाडी 3-0 वर नेली. 51 व्या मिनिटाला डॉकियर सेबॅस्टिनने, तर डी स्लोव्हर आर्थरने 57 व्या मिनिटाला गोल करून सामन्याचे भवितव्य पूर्णपणे निश्चित केली.
पहिल्या सत्रात चार शॉर्ट कॉर्नर्सचा फायदा घेऊ न शकलेल्या जर्मनीने जपानविरुद्धही अशीच कामगिरी केली. त्यांचा कर्णधार मॅट्स ग्रॅम्बुश याने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केल्यानंतर जपानी प्रतिकार क्षीण झाला. त्यानंतर ख्रिस्तोफर रुहरने शानदार आक्रमण करत नेत्रदीपक आघाडी वाढविली आणि थीस प्रिंझने अंतिम सत्रात 3-0 अशी आघाडी केली.