वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया (स्पेन)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या 2022 च्या महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ करताना रविवारच्या सलामीच्या सामन्यात चिलीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सलामीच्या सामन्यात भारतातर्फे आघाडी फळीतील संगीता कुमारीने दुसऱया मिनिटाला, मध्यफळीतील सोनिकाने 10 व्या मिनिटाला तर नवनीत कौरने 31 व्या मिनिटाला गोल नोंदविले. चिलीतर्फे एकमेव गोल 43 व्या मिनिटाला व्हिलाग्रेनने केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने चिलीवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्व मानांकन यादीत भारत आठव्या तर चिली दहाव्या स्थानावर आहे. भारताने आपले खाते दुसऱया मिनिटाला उघडल्यानंतर चिलीने गोल करण्याची संधी गमावली. सोनिकाने दहाव्या मिनिटाला भारताची आघाडी वाढविली. या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी कॉर्नर्स गमावल्याने त्यांना हा सामना मोठय़ा फरकाने जिंकता आला नाही. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना याच मैदानावर आशियाई चॅम्पियन्स जपानबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचा गटातील शेवटचा सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर होईल. या स्पर्धेत संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील विजेता संघ 2023-24 च्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी आगेकूच करेल.