वृत्तसंस्था/ बेनोनी
दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला संघाने विजयी सलामी देताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा 7 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील श्वेता सेहरावतने नाबाद 92 धावांची खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 5 बाद 166 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 16.3 षटकात 3 बाद 170 धावा जमवित विजय नोंदविला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात लॉरेन्सने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 61, रेन्सबर्गने 2 षटकार 4 चौकारांसह 23, लँड्समनने 17 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32, रिनेकीने 11 तसेच मेसोने 3 चौकारांसह नाबाद 19 आणि स्मिटने 3 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. भारतातर्फे कर्णधार शेफाली वर्माने 2 तर सोनम यादव आणि चोप्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात सलामीच्या श्वेता सेहरावतने 57 चेंडूत 20 चौकारांसह नाबाद 92 धावा फटकाविताना कर्णधार शेफाली वर्मासमवेत पहिल्या गडय़ासाठी 7.1 षटकात 77 धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने 16 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 45, त्रिशाने 3 चौकारांसह 15, सौम्या तिवारीने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. भारताच्या डावात 1 षटकार आणि 33 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे नायडू, स्मिट आणि लँड्समन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सेहरावतला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 20 षटकात 5 बाद 166 (लॉरेन्स 61, लँड्समन 32, रेन्सबर्ग 23, शेफाली वर्मा 2-31, सोनम यादव, चोप्रा प्रत्येकी 1 बळी), भारत 16.3 षटकात 3 बाद 170 (श्वेता सेहरावत नाबाद 92, शेफाली वर्मा 45, त्रिशा 15, सौम्या तिवारी 10, नायडू, स्मिट आणि लँड्समन प्रत्येकी 1 बळी).