वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने येथे सुरू झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेत विजयी सलामी देताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करणाऱया अमनज्योत कौरने 30 चेंडूत नाबाद 41 धावा झळकविल्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 6 बाद 147 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा निम्मा संघ 12 षटकात 69 धावांमध्ये बाद केला होता. पण त्यानंतर दीप्ती शर्माने अमनज्योत कौर समवेत सहाव्या गडय़ासाठी 50 चेंडूत 76 धावांची भागीदारी केल्याने भारताला 147 धावांपर्यंत मजल मारता आली. दीप्ती शर्माने 23 चेंडूत 33 तर 23 वर्षीय अमनज्योत कौरने 30 चेंडूत नाबाद 41 धावा जमविल्या. यास्तिका भाटियाने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा झळकविल्या. या सामन्यात शेफाली वर्माला विश्रांती देण्यात आली होती. स्मृती मंदाना लवकर बाद झाली. देओलने 8 तर देविका वैद्यने 9 धावा जमविल्या. रॉड्रिग्जला आपले खाते उघडता आले नव्हते. पॉवर प्लेमध्ये भारताने 1 बाद 29 धावांपर्यंत मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे मेलाबाने 15 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 120 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 27 धावांनी गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात लुसने 29 तर ट्रायोनने 26 तसेच कॅपने 22 धावांचे योगदान दिले. भारतातर्फे दीप्ती शर्माने 30 धावात 3 तर देविका वैद्यने 19 धावात 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 20 चेंडूमध्ये विजयासाठी 45 धावांची जरुरी होती. पण त्यांना हे उद्दिष्ट गाठता आले नाही. या तिरंगी मालिकेत आता भारतीय महिला संघाचा पुढील सामना विंडीजबरोबर येत्या सोमवारी होत आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 6 बाद 147 (अमनज्योत कौर नाबाद 41, यास्तिका भाटिया 35, दीप्ती शर्मा 33, देओल 8, मलाबा 2-15), दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 120 (लुस 29, ट्रायोन 26, कॅप 22, दीप्ती शर्मा 3-30, देविका वैद्य 2-19).