प्रतिस्पर्धी लंकन संघाला 41 धावांनी नमवले, रॉड्रिग्यूज सामन्यात सर्वोत्तम
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
जेमिमा रॉड्रिग्यूजने टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम 76 धावांची खेळी साकारल्यानंतर भारतीय महिला संघाने आशिया टी-20 चषक स्पर्धेत श्रीलंकन महिला संघाविरुद्ध 41 धावांनी विजयी सलामी दिली. रॉड्रिग्यूजच्या 53 चेंडूतील खेळीत 11 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. भारतीय संघाने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लंकन महिला संघाचा डाव 18.2 षटकात सर्वबाद 109 धावांवर खुर्दा झाला.
या सामन्यात तिन्ही आघाडय़ांवर भारतीय महिला संघाने वरचष्मा गाजवला. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने धक्के देण्यात सातत्य राखले आणि यातून लंकन संघ अजिबात सावरु शकला नाही.
प्रारंभी, भारतीय संघ प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर फारशी आश्वासक सुरुवात करु शकला नाही. उपकर्णधार स्मृती मानधना (6) स्वस्तात बाद झाली तर शफाली वर्माचा (10) खराब फॉर्म येथेही कायम राहिला. मनगटाच्या दुखापतीतून सावरलेल्या रॉड्रिग्यूजने मात्र उत्तम फटके लगावत लंकन गोलंदाजांची उत्तम धुलाई केली. तिने जवळपास प्रत्येक षटकात किमान चेंडू सीमापार पिटाळला आणि 38 चेंडूत अगदी थाटात अर्धशतक साजरे केले. तिने 30 चेंडूत 33 धावा जमवणाऱया हरमनप्रीत कौरसमवेत उत्तम भागीदारी साकारत संघाला शतकी भागीदारी पार करुन दिली. या जोडीने 71 चेंडूत 92 धावांची भागीदारी साकारली.
कर्णधार हरमनप्रीत कौरला 15 व्या षटकात सुगंदिका कुमारीच्या (1-26) गोलंदाजीवर रणसिंघेकडून जीवदान मिळाले. लंकन गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये काही विकेट्स जरुर घेतले. पण, रॉड्रिग्यूजने आपल्या कारकिर्दीतील 72 धावांची सर्वोत्तम खेळी या सामन्यात मागे टाकली. नंतर ती चमारी अटापटूच्या खाली राहिलेल्या एका संथ चेंडूवर त्रिफळाचीत झाली. दयालन हेमलताने नाबाद 13 धावा केल्या तर रिचा घोषने शेवटी षटकार खेचला.
विजयासाठी 151 धावांचे आव्हान असताना लंकेने रेणुका सिंगच्या डावातील पहिल्या षटकात 13 धावांचा फ्लाईंग स्टार्ट नोंदवला. मात्र, हाच मोमेंटम ते नंतर अजिबात कायम ठेवू शकले नाहीत. अष्टपैलू दीप्ती शर्माला (2-15) चमारीची प्राईज विकेट मिळाली. चमारीने ऑन साईडला स्लॉग करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगवर तैनात रेणुकाकडे सोपा झेल दिला. दीप्तीने पुढे माल्शाला धावचीत केले तर हर्षिताही आठव्या षटकात धावबाद होत तंबूत परतली.
पुढे, आवश्यक धावगती आटोक्याबाहेर जात राहिली आणि लंकन फलंदाजांवर दडपण वाढत राहिले. पूजा वस्त्रकारने (2-12) निलाक्षी डीसिल्व्हा (3), कविशा दिलहारी (1) यांना बाद करत लंकेला 5 बाद 61 असे अडचणीत आणले. हसिनी पेरेराने 30 धावांसह थोडाफार प्रतिकार केला आणि यष्टीरक्षक-फलंदाज अनुष्का संजीवनी (5), ओशादि रणसिंघेसह (11) यांच्यासह 100 धावांचा टप्पा सर केला. मात्र, फिरकीपटू हेमलताने 15 धावात 3 बळींसह लंकन संघाचा प्रतिकार खऱया अर्थाने संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 20 षटकात 6 बाद 150 (जेमिमा रॉड्रिग्यूज 53 चेंडूत 11 चौकार, 1 षटकारासह 76, हरमनप्रीत कौर 30 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 33, दयालन हेमलता 10 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 13. अवांतर 1. ओशादि रणसिंघे 4 षटकात 3-32, सुगंदिका कुमारी, चमारी अटापटू प्रत्येकी 1 बळी).
लंकन महिला संघ ः 18.2 षटकात सर्वबाद 109 (हसिनी पेरेरा 32 चेंडूत 3 चौकारांसह 30, हर्षिता समरविक्रमा 20 चेंडूत 5 चौकारांसह 26, ओशादि रणसिंघे 10 चेंडूत 11. अवांतर 13. दयालन हेमलता 2.2 षटकात 15 धावात 3 बळी, दीप्ती शर्मा 4 षटकात 2-15, पूजा वस्त्रकार 4 षटकात 2-12, राधा यादव 1-15).