हॅलेप, सित्सिपस, फ्रिट्झ, थिएम पहिल्याच फेरीत पराभूत, वावरिंकाची दुखापतीमुळे माघार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
निवृत्त होण्याआधीच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये खेळणाऱया सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन स्पर्धेत विजयी सुरुवात करीत दुसरी फेरी गाठली तर सिमोना हॅलेप, स्टीफानोस सित्सिपस, टेलर फ्रिट्झ, डॉमिनिक थिएम यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. सॅकेरी, कॅरोलिन गार्सिया, बियान्का अँड्रीस्क्यू यांनीही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली.
40 वर्षीय सेरेनाने माँटेनेग्रोच्या डन्का कोविनिकचा 6-3, 6-3 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिने आतापर्यंत 21 वेळा विजय मिळविताना एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. तिची ही शेवटची ग्रँडस्लॅम असल्याने प्रेक्षकांनी या लढतीसाठी मोठी गर्दी केली होती आणि त्यांनी ‘वी लव्ह सेरेना’, असे फलक दाखवित तिला प्रोत्साहितही केले. प्रेक्षकांमध्ये काही नामवंतांनीही हजेरी लावली होती, त्यात माईक टायसन, ग्लॅडीस नाईट व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टन यांचा समावेश होता. गेस्ट बॉक्समध्ये तिची चार वर्षाची मुलगीही उपस्थित होती. तिची पुढील लढत इस्टोनियाच्या द्वितीय मानांकित ऍनेट कोन्टोव्हीटशी होणार आहे.
हॅलेप, सित्सिपस, फ्रिट्झ यांना धक्का
पहिल्या फेरीत एक धक्कादायक निकालही पहावयास मिळाला. माजी अग्रमानांकित व सध्या सातव्या क्रमांकावर असणाऱया सिमोना हॅलेपला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले. तीन सेट्सच्या लढतीत तिला युक्रेनच्या दारिया स्निगुरने 6-2, 0-6, 6-4 असे हरविले. स्निगुरविरुद्ध झालेली हॅलेपची ही पहिलीच लढत होती. पुरुष एकेरीतही चौथ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसला पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याला पात्रता फेरीतून आलेल्या कोलंबियाच्या डॅनियल इलाही गॅलनने 6-0, 6-1, 3-6, 7-5 असे नमविले. माजी चॅम्पियन डॉमिनिक थिएमलाही पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला पाब्लो कॅरेनो बुस्टाने चार सेट्सच्या लढतीत हरविले. याशिवाय 10 व्या मानांकित टेलर फ्रिट्झलाही पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याला अमेरिकेच्याच पात्रता फेरीतून आलेल्या ब्रँडन होल्टने 6-7 (3-7), 7-6 (7-1), 6-3, 6-4 असे नमविले. स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकालाही दुसऱया सेटच्या टायब्रेकरवेळी दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.
अँड्रीस्क्यू, विजयी
महिलांच्या अन्य सामन्यात बियान्का अँड्रीस्क्यूने फ्रान्सच्या हार्मनी टॅनचा पराभव केला. तिसरी मानांकित मारिया सॅकेरी व 17 वी मानांकित कॅरोलिन गार्सिया यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळविले. सॅकेरीने ताताना मारियाचा तीन सेट्समध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीत रशियाच्या अग्रमानांकित डॅनील मेदवेदेव्हने दुसरी फेरी गाठताना स्टीफान कोझलोव्हवर 6-2, 6-4, 6-0 अशी सहज मात केली. त्याची दुसरी लढत फ्रान्सच्या ऑर्थर रिंडरक्नेचविरुद्ध होईल. मेदवेदेव्हने मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली असून सलग दुसऱयांदा जेतेपद मिळवून फेडररनंतर असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
मरे, पॉल दुसऱया फेरीत
ब्रिटनच्या अँडी मरेनेही दुसरी फेरी गाठताना अर्जेन्टिनाच्या 24 व्या मानांकित फ्रान्सिस्को सेरुन्डोलोच्चा 7-5, 6-3, 6-3 असा पराभव केला. अन्य सामन्यात टॉमी पॉलने बर्नाबे झपाटा मिरालेसवर 4-6, 6-3, 2-6, 6-0, 7-5 अशी मात केली. तीन तास दहा मिनिटे ही लढत रंगली होती. अमेरिकेच्या 16 व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्ट ऍगटला जेजे वुल्फने सरळ सेट्सनी पराभवाचा धक्का दिला. चीनच्या वु यिबिंगने 31 व्या मानांकित निकोलोझ बेसिलाश्विलीचा 6-3, 6-4, 6-0 असा पराभव करीत अमेरिकन ओपन स्पर्धेत सामना जिंकणारा पहिला चायनीज टेनिसपटू होण्याचा मान मिळविला.