बेळगाव : विद्याभारती कर्नाटक प्रदेश व बेळगाव जिल्हा विद्याभारती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या. विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान गोपाळ जीनगौडा शाळेला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर, स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी विद्याभारती राज्य समन्वयक सुजाता दप्तरदार, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, ओमकार गावडे, मयुरी पिंगट, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार उपस्थित होते.
प्रारंभी मयुरी पिंगट हिने बिदर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत झालेल्या बैठकीचा आढावा घेतला. बैठकीत आगामी जिल्हास्तरीय विद्याभारती स्पर्धा विविध ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार दि. 5 जुलै रोजी अनगोळमधील संत मीराच्या शाळेच्या मैदानावर हँडबॉल स्पर्धा व सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर प्राथमिक मुला मुलींची फुटबॉल स्पर्धा होतील. बुधवार दि. 10 जुलै रोजी बुद्धिबळ, योगा, कराटे, शटल बॅडमिंटन स्पर्धा शिंदोळी येथील गोपाळ जीनगौडा शाळेच्या सभागृहात तर अॅथलेटिक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल स्पर्धा नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ, संत मीरा इंग्रजी स्कूल गणेशपूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, सी. व्ही. रामन स्कूल रामदुर्ग, गोपाळ जिनगौडा स्कूल शिंदोळी या शाळेचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.