Tarun Bharat

चित्रकलेचे जिद्दी उपासक विद्याधर यादव

Advertisements

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी

एखादी तरी कला प्रत्येक माणसामध्ये उपजतच असते. मनात कोणत्याही एका विशिष्ट कलेचा छंद हा असतोच. ती कला आपण ओळखून जोपासना केली पाहिजे. स्वतःमध्ये असणाऱया कलेचे सादरीकरण केल्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. बेळगुंदी येथील सरकारी आमदार प्राथमिक मराठी शाळेत गेल्या 17 वर्षांपासून बहुरंगी चित्रांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी व भागातील नागरिकांचे जीवन विविध रंगांमध्ये बहारदार करण्याचे कार्य विद्याधर यादव हे शिक्षक करीत आहेत.

बेळगुंदी शाळेतील चित्रकला शिक्षक विद्याधर यादव शाळेतील काळय़ा फळय़ावर केवळ रंगीत खडूच्या साहाय्याने विविध क्रांतिकारी महापुरुष, राष्ट्रीय सण, देशात साजरे करण्यात येणारे होळी, गणेशोत्सव, रंगपंचमी, नवरात्रोत्सव, पंढरीची वारी, छत्रपती शिवाजी महाराज आदी सोहळय़ांच्या निमित्ताने त्या-त्या सणांची व थोर महापुरुषांची हुबेहुब चित्रे रेखाटत आहेत.

त्यांनी शाळेच्या फळय़ावर काढलेली चित्रे पाहण्यासाठी परिसरातील शिक्षणप्रेमी व नागरिकांची नेहमी शाळेत गर्दी होत असते. त्यांच्या या आगळय़ा-वेगळय़ा चित्रकलेच्या प्रदर्शनामुळे बेळगुंदी मराठी शाळेचा गौरव या भागात होताना दिसतो.

प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा मुख्य पाया आहे. बेळगुंदीच्या आदर्श आमदार प्राथमिक मराठी शाळेत येणाऱया बालकांच्या मनात त्यांच्या उज्ज्वल आयुष्यातील विविध प्रकारच्या आशेचे रंग विद्याधर यादव यांच्या चित्रांतून बिंबविले जात आहेत. प्राथमिक शाळेतून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे शिकविले जातात, त्यावरूनच त्यांचे पुढील आयुष्य आकार घेत असते. फळय़ावरील विविध संदेश देणारी चित्रे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आहे, अशी माहिती पालकांनी दिली.

हुबेहुब चित्रे रेखाटण्याची कला

विद्याधर यादव यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेतील फळय़ावर सुभाषचंद्र बोस व शहीद भगतसिंग यांची हुबेहुब चित्रे रेखाटली आहेत. त्यांनी ही चित्रे केवळ खडूच्या साहाय्याने रेखाटली असून यासाठी अडीच दिवसांचा कालावधी लागला, अशी माहिती त्यांनी दिली.

कलरमध्ये चित्र काढणे, ऑईल पेंट, पोर्ट्रेटमध्ये चित्र काढणे थोडे सोपे असते. मात्र, फक्त खडूच्या माध्यमातून चित्र काढताना अधिक वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले. विद्याधर यादव यांचे मूळ गाव निपाणी आहे. त्यांचे शिक्षण निपाणी येथेच झाले. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती.

शिक्षकांची शाब्बासकीची थाप

वहीच्या पानावर पेन्सीलच्या साहाय्याने तसेच पाटीवर खडूने चित्र काढण्याचा सराव ते करीत. सातवीमध्ये शिकत असताना त्यांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. निसर्गसौंदर्याचे चित्र काढून आपल्या शिक्षकांना दाखविल्यानंतर शिक्षकांनी आपल्याला शाब्बासकीची थाप दिली. त्यानंतर माझा उत्साह वाढत गेला अन् मी वेगवेगळी चित्रे काढू लागलो, असेही त्यांनी सांगितले.

इयत्ता आठवीमध्ये असताना त्यांनी विनोद खन्ना यांचे चित्र रेखाटले. दहावी झाल्यानंतर दोन वर्षे चित्रकलेचा कोर्स केला अन् त्यानंतर बेळगुंदी येथील सरकारी आमदार आदर्श मराठी शाळेत नोकरी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची चित्रे आपण काढलेली आहेत, असे सांगितले. बेळगुंदी शाळेत महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आदींची चित्रे त्यांनी शाळेच्या फळय़ांवर रंगवून गावकऱयांची वाहव्वा मिळविली आहे.

मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे  

 अलीकडेच इंग्रजीचे फॅड अधिक वाढल्याने पालकवर्ग आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठविताना दिसत आहे. आपला मुलगा-मुलगी इंग्रजी शाळेत जातो, हे सांगताना आई-वडिलांना समाजात एक वेगळाच अभिमान वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधुनिक युगात इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेऊनही उच्च पदावर पोहोचता येते, याचे भानही प्रत्येकाने ठेवायलाच हवे.

ग्रामीण भागातही मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी गावपातळीवर अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. बेळगुंदी गावातील या प्राथमिक मराठी शाळेत सध्या 270 इतकी पटसंख्या आहे. मुख्याध्यापिकेसह एकूण 9 शिक्षक आहेत. विद्याधर यादव यांना या कामी मुख्याध्यापिका एस. पी. गोळे यांच्यासह एसडीएमसी कमिटीचेही सहकार्य लाभत आहे.

Related Stories

आनंद अकादमीचा 6 गडय़ानी विजय

Amit Kulkarni

‘त्या’ अत्याचाराविरोधात महिला एकवटल्या

Patil_p

कालेनजीक लोहमार्गावर कोसळलेला ‘तो’ वृक्ष हटविला

Rohan_P

युवकाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक

Patil_p

पार्किंग रोखण्यासाठी दगडांचा आधार

Amit Kulkarni

उपनोंदणी कार्यालय पुन्हा सीलडाऊन

Patil_p
error: Content is protected !!