केएससीए बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यात जानोपँथर क्रिकेट अकादमी गदग संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा, टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका संघाचा तर विजय क्रिकेट अकादमीने स्पोर्ट्स अकादमी ऑफ गदग अ संघाचा पराभव करुन प्रत्येकी 3 गुण मिळविले.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जानोपँथर क्रिकेट अकादमी गदग संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी बाद 246 धावा केल्या. त्यात रियाझ कोटंबालाने 49, सोहेल अहमदने नाबाद 38, प्रविण कुमारने 24 तर प्रल्हाद के. ने 22 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे तरुण हिरेमठने 34 धावात 4, साईप्रसाद व नवनित यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा डाव 32.1 षटकात 140 धावात आटोपला. त्यात चंद्रगणेशने 30, उदय जाकाने 28, विरण्णाने 22 धावा केल्या. जानोपँथरतर्फे सतीशकुमार एन. ने 24 धावात 5 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका संघाने प्रथम फलंदाजी करताना 32.5 षटकात सर्व गडी बाद 195 धावा केल्या. त्यात लिखित बन्नूरने 86, श्रेयसने 60 धावा केल्या. टॅलेंट स्पोर्ट्स हुबळीतर्फे अझुरुद्दीन नदाफने 3 तर अभिलाश, श्रवण व रवीकुमार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळीने 41 षटकात 5 गडी बाद 196 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात संजयने 71, ऋषिकेशने 45, रवीकुमार 30 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात विजय क्रिकेट अकादमी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी बाद 234 धावा केल्या. त्यात अरविन हिरेमठने 100, रिहानने 28, मनिकांतने 21, अजयने 14 धावा केल्या. स्पोर्ट्स अकादमी गदग संघात कार्तिकने 3, शिवराज व सचिन याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गदग संघाचा डाव 33.4 षटकात 153 धावात आटोपला. त्यात शिवराज करडाईने 37, शुभमने 29 धावा केल्या. विजयातर्फे आदर्श नाईकने 5 गडी, मयांकराज पाटीलने 2 गडी बाद केले.