क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केंद्रीय कर रिकरेशन क्लब बेळगाव आयोजित आंतरविभागीय राजीव काकती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजयनगर वॉरियर्स संघाने गुलबर्गा रॉयल संघाचा 53 धावांनी पराभव करुन राजीव काकती चषक पटकाविला. जतीन वर्मा याला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. होनगा येथील फिनिक्स स्कूल मैदानावर अंतिम सामन्यात विजयनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्व गडी बाद 123 धावा केल्या. त्यात जतीन वर्माने 49, अंबरीश 18 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुलबर्गा रॉयल संघाचा डाव 14.1 षटकात 70 धावात आटोपला. त्यात अनुरुप निखिलने 19 तर नवीनने 17 धावा केल्या. विजयनगरतर्फे जतीन वर्माने 17 धावात 4 तर अंबरीश 11 धावात 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे कर आयुक्त बसवराज निलगावी, सहाय्यक आयुक्त जयभारती, मुरगन यांच्या हस्ते विजेत्या विजयनगर वॉरियर्सला व उपविजेत्या गुलबर्गा रॉयल संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर जतीन वर्मा (विजयनगर), उत्कृष्ट फलंदाज अंबरीश (विजयनगर), उत्कृष्ट गोलंदाज अनुरुप निखील (गुलबर्गा), उत्कृष्ट झेल अनिल माने (रायण्णा) अशी वैयक्तिक बक्षीसे देऊन गौरविण्यात आली.