15 जुलैला पदभार स्वीकारणार : तीन पंतप्रधानांसोबत बजावली कार्यतत्पर सेवा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) आणि माजी राजदूत विक्रम मिस्री यांची भारत सरकारच्या पुढील परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय परराष्ट्र सेवेमधील (आयएफएस) 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. मिस्री यांनी यापूर्वी तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी 1997 मध्ये इंदर कुमार गुजराल, 2012 मध्ये मनमोहन सिंग आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम केले आहे. मिस्री यांचा जन्म 1964 मध्ये श्रीनगरमध्ये झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले.
सध्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून मिस्री यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला असून त्यांची भारताचे पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 15 जुलैपासून ते परराष्ट्र सचिव म्हणून कार्यभार स्वीकारतील. ते इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामरिक परिस्थितीसंबंधी खूप अनुभवी आहेत. याशिवाय ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत उप एनएसए म्हणून काम करत आहेत. याशिवाय त्यांनी युरोप, आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील विविध भारतीय मिशनमध्येही काम केले आहे. ते म्यानमार आणि स्पेनमध्ये भारताचे राजदूत राहिले आहेत. जून 2020 मध्ये, लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक चकमकीदरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये भाग घेतला. याशिवाय नागरी सेवांसाठी तयार होण्यापूर्वी त्यांनी जाहिरात आणि फिल्म मेकिंग इंडस्ट्रीमध्ये 3 वर्षे काम केले आहे.
याआधी 2012 ते 2014 या काळात विक्रम मिस्री हे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वीय सचिव होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मे ते जुलै 2014 पर्यंत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम केले. याशिवाय 1997 मध्ये ते तत्कालीन पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे खासगी सचिव होते.