Tarun Bharat

सिडीवर्क कामासाठी रस्ताच बंद केल्याने ग्रामस्थांची गैरसोय

बसरीकट्टी येथील कामाचा नाहक त्रास : कामाबद्दल कंत्राटदार – ग्रा.पं.कडून उडवाउडवीची उत्तरे

वार्ताहर /सांबरा

सिडीवर्कच्या कामासाठी मुख्य रस्ताच बंद करण्यात आल्याने बसरीकट्टी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सदर सीडीवर्कच्या कामाबद्दल कंत्राटदार व ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे निलजी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत सुरू असलेल्या या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसापासून शिंदोळीनजीक असलेल्या मुख्य रस्त्यावर सिडीवर्कचे काम करण्यात येत आहे. रस्त्यावर चर खोदून त्या ठिकाणी काँक्रीट घालण्यात आले आहे. मात्र सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. वास्तविक पाहता हा मुख्य रस्ता असल्याने सिडीवर्कचे काम तातडीने करून रस्ता खुला करणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कामाबद्दल बसरीकट्टी येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत कंत्राटदाराला विचारले असता त्याने निलजी ग्रामपंचायतीमधून परवानगी घेऊनच काम करत असल्याचे सांगितले.

 त्यानंतर गावातील विकास देसाई, तानाजी चौगुले, दिलीप कोंडुस्कोप, भाऊ चौगुले, रतन चौगुले, राहुल मोदगेकर, मनोहर चौगुले आदी तरुणांनी निलजी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सेक्रेटरीला याबाबत विचारले असता आम्ही कंत्राटदाराला काम करण्याची परवानगी दिलेली नाही, असे उत्तर दिले.

त्यानंतर या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशीही विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडूनही समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून सिडीवर्कचे काम नेमके कोणत्या फंडातून करण्यात येत आहे व सदर काम केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रस्ता बंद केल्याने बससेवाही बंद

सीडीवर्कच्या कामामुळे मुख्य रस्ताच बंद करण्यात आल्याने बसरीकट्टी येथील बस सेवा बंद झाली आहे. त्यामुळे बसरीकट्टी येथून बेळगावला कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळा व महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी सीडीवर्कचे काम पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

पोलीस ध्वज दिन कार्यक्रम साजरा

Amit Kulkarni

अशोकनगर येथील इस्पितळात कोविड लसीकरणास प्रारंभ

Patil_p

बी-बियाणे वितरणाकडे पशुसंगोपन खात्याचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

निवेदिता यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत सुरक्षित ठेऊया

Patil_p

आंबेवाडी येथे नवख्या चेहऱयांना संधी

Omkar B

अमाननगर येथे चोरीचा प्रकार

Patil_p