प्रतिनिधी /फोंडा
सावईवेरे गावचे सुपूत्र लोककलेचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी संजीव वेरेकर व कवी उदय म्हांबरे यांचा नागरी सत्कार शनिवार 23 रोजी सायं. 4.30 वा. सावईवेरे येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ग्रंथदिनाचे औचित्य साधून सावईवेरे ग्रंथालयातर्फे ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सत्कार सोहळा होणार आहे.
सत्कार सोहळा आयोजन समितीचे प्रमुख व ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयोजन समितीचे निमंत्रक काशिनाथ नाईक, सचिव सुरेश नाईक व साळू भगत हे उपस्थित होते. विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार लाभल्याबद्दल, संजीव वेरेकर यांना हल्लीच केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याने तर कवी उदय म्हांबरे यांना मंगळूर येथील विश्व कोकणी केंद्राचा विमला पै कविता पुरस्कार मिळाल्याने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळय़ाला प्रमुख वक्ते म्हणून आकाशवाणी पणजीकेंद्राचे वृत्त निवेदक व साहित्यिक मुकेश थळी तर अध्यक्ष पर्यावरण प्रेमी व सावईवेरे ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई हे उपस्थित असतील. वेरे वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्कार सोहळय़ापूर्वी तिघाही सत्कार मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढण्यात येईल. सावईवेरे व वळवई गावात आतापर्यंत संगीत नाटक व साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील सात पुरस्कार प्राप्त झाले आहे. हा वारसा निरंतर सुरु राहावा व सत्कारमूर्तींचे कार्य कर्तृत्व नवीन पिढीसमोर ठेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या सत्कार सोहळय़ामागील उद्देश असल्याचे डॉ. देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले. सत्कार सोहळय़ाला ग्रामस्थ व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.