सैन्य अन् इम्रान समर्थक आमने-सामने : सरकारला 6 दिवसांचा अल्टीमेटम
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आझादी मार्चमुळे बुधवारपासुन राजधानी इस्लामाबाद धुमसत आहे. पाकिस्तानात गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टी (पीटीआय) आणि सरकार यांच्यात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. याचदरम्यान राजधानीत इम्रान खान यांनी आणखीन एक मोठी सभा घेण्याची घोषणा केल्याने सरकारने आता सुरक्षेसाठी सैन्याला पाचारण केले आहे.
इम्रान खान यांनी निवडणुकीची घोषणा करण्यासाठी शाहबाज शरीफ सरकारला 6 दिवसांचा अल्टीमेटम देत रॅली समाप्त केली आहे. तर बुधवारी रात्री उशिरा इम्रान खान हे लाखो समर्थकांसह इस्लामाबादनजीक पोहोचले होते. तेथे पीटीआय समर्थक आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली. पोलिसांनी खान समर्थकांना अश्रूधूराचा वापर केला होता. इम्रान खान यांच्या आझादी मार्चच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादला रेड झोन घोषित करण्यात आले होते.
मरियम यांचा आरोप
इम्रान यांच्या आझादी मार्चवर सत्तारुढ आघाडीच्या नेत्या मरियम नवाज यांनी निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधानांच्या सुचनेनुसार पीटीआयचे कार्यकर्ते हिंसा घडवून आणत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शांतेत निदर्शने करण्याची अनुमती दिली असली तरीही हिंसा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
इम्रान यांचा पक्ष शाहबाज यांच्या सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहे. हंगामी सरकार स्थापन करून लवकरात लवकर निवडणूक घेतली जावी असे इम्रान यांचे म्हणणे आहे. तर संसदेचा कार्यकाळ पुढील वर्षाच्या ऑगस्टपर्यंत आहे.