संसद, सर्वोच्च न्यायालय, अध्यक्षीय भवनात शिरले बोल्सोनारो समर्थक ः मोठय़ा प्रमाणात तोडफोड ः 400 जणांना अटक
वृत्तसंस्था / ब्राझिलिया
ब्राझीलमध्ये माजी अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनात रविवारी शिरकाव केला. या समर्थकांनी तेथे जात मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली आहे. गोंधळ घालणाऱया 400 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर ब्राझीलमधील या घटनेवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. ब्राझिलियामध्ये निदर्शकांनी शासकीय संस्थांच्या विरोधात केलेल्या दंगली तसेच तोडफोडीच्या घटनेमुळे अत्यंत चिंतेत आहे. लोकशाहीचा सर्वांनी आदर करायला हवा. ब्राझीलच्या अधिकाऱयांना आमचे पूर्ण समर्थन असल्याचे मोदींनी एका ट्विटमध्ये नमूद केले आहे.
पोलिसांनी शासकीय इमारतीत घुसलेल्या समाजकंटकांना बाहेर काढले आहे. हा अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यासारखा प्रकार असल्याचे ब्राझीलच्या सरकारने म्हटले आहे. तर हा फॅसिस्ट शक्तींचा हल्ला असल्याची टिप्पणी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाची शपथ घेतलेल्या लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांनी केली आहे.
ब्राझीलच्या प्रमुख शासकीय इमारतींमध्ये ज्याप्रकारे हिंसा झाली, तशीच हिंसा 2 वर्षांपूर्वी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत झाली होती. तेव्हा निवडणुकीत पराभूत झालेले तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक कॅपिटल हिल म्हणजेच अमेरिकेच्या संसदेत शिरले होते. या समर्थकांनी संसदेत मोठय़ा प्रमाणात हिंसा केली होती.
बोल्सोनारो समर्थक आक्रमक
अशाप्रकारच्या दहशतवादी घटना सध्या थांबणार नसल्याचे काही लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत, परंतु आम्ही त्यांना असे करू देणार नाही. ब्राझीलच्या लोकशाहीला ते उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. राजकीय संघर्षाला गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. गुन्हेगारांसोबत गुन्हेगारांप्रमाणे वागले जाणार असल्याचे उद्गार ब्राझीलचे न्याय मंत्री फ्लॅवियो डीनो यांनी काढले आहेत.
नव्या अध्यक्षांसमोरील आव्हान
ब्राझीलमध्ये ऑक्टोबरमध्ये अध्यक्षीय निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत बोल्सोनारो हे पराभूत तर लुइज इनासियो लूला डा सिल्वा विजयी झाले होते. 1 जानेवारी रोजी सिल्वा यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर बोल्सोनारो समर्थकानी शासकीय इमारतींमध्ये घुसखोरी केली. बोल्सोनारो समर्थकांनी सिल्वा यांना अध्यक्ष मानण्यास नकार दिला आहे. निदर्शक राजधानी ब्राझिलियामध्ये ठाण मांडून आहेत. यामुळे संसदेचे कामकाज अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.
बोल्सोनारो यांच्याकडून हिंसेची निंदा
अध्यक्ष सिल्वा यांनी पत्रकार परिषद घेत ब्राझिलियामध्ये झालेल्या हिंसेला असभ्य ठरविले आहे. सुरक्षेत त्रुटी राहिल्यानेच बोल्सोनारोंचे समर्थक संसदेत शिरू शकले. अशाप्रकारचे लोक राजकारणाला गलिच्छ स्वरुप प्राप्त करून देत असतात. हिंसेत सामील सर्व लोकांना शिक्षा होणारच असे सिल्वा यांनी म्हटले आहे. तर बोल्सोनारो यांनीही ट्विट करत स्वतःच्या समर्थकांची निंदा केली आहे. लोकशाहीत निदर्शने नेहमीच शांततेत आणि कायद्यात कक्षेत व्हावीत. शासकीय इमारतींवर झालेले हल्ले चुकीचे असल्याचे बोल्सोनारो यांनी नमूद केले आहे.
अपमानजनक स्थिती ः बिडेन
ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या समर्थकांकडून देशाची संसद, अध्यक्षीय भवन, सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्यात आल्यावरची स्थिती अपमानजनक होती असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी काढले आहेत.