लक्षावधी विद्यार्थी-नागरिक रस्त्यावर, अध्यक्ष जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी
@ बीजिंग / वृत्तसंस्था
चीन सरकारच्या कोरोना धोरणाविरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. संपूर्ण देशभर अनेक शहरांमध्ये लक्षावधी तरुण, विद्यार्थी आणि नागरीक सरकारविरोधात आंदोलन करीत आहेत. चीन सरकारने कोरोना हटविण्याच्या दृष्टीने कठोर लॉकडाऊन अनेक शहरांमध्ये लागू केला आहे. त्यामुळे नागरीकांच्या संतापाचा कडेलोट झाला असून त्यांनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर उग्र निदर्शने गेले चार दिवस चालविली आहेत.
गुरुवारी चीनच्या झिनजियांग प्रांतात उरुमकी येथे काही इमारतींना मोठी आग लागली. मात्र, कठोर लॉकडाऊन असल्याने आग विझविण्यासाठी त्वरेने प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळे आगीत अनेकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या चीनी प्रशासनाकडून लपविण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर लोकांच्या संयमाचा बांध फुटून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन विरोधात निदर्शनांना प्रारंभ झाला आहे. आंदोलनाचे लोण नव्या शहरांमध्ये पसरत आहे.
आंदोलकांकडून श्रद्धांजली
उरुमकी येथील आगीत दहा जणांचा बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. या 10 जणांना शांघाय येथे रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱयांनी श्रद्धांजली अर्पण केली. प्रशासकीय इमारतींसमोर हजारो युवक एकत्र होत असून ते सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. अध्यक्ष जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच लॉकडाऊन उठविण्यासाठी दबाव आणला जात आहे.
लॉकडाऊन अयशस्वी
देशातील अनेक शहरांमध्ये चीनने नागरीकांना घरातून बाहेर पडण्यासही बंदी घातली आहे. ‘शून्य कोरोना’ धोरणाच्या अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. परिणामी जनजीवन ठप्प झाले असून लोकांना कामधंद्यांसाठीही बाहेर पडणे अशक्य होत आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, याच लॉकडाऊनच्या विरोधात लक्षावधी लोक एकत्र येऊन आंदोलन करीत असल्याने लॉकडाऊनचा उद्देशच असफल झाल्याची टीका होत आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
आंदोलने दडपून टाकण्यासाठी चीनी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक सरकारी इमारतीच्या समोर पोलिसांच्या अनेक रांगा लावल्या आहेत. त्यांना ओलांडून इमारतींपर्यंत पोहचणे आंदोलकांना अशक्य असले तरी ते बाहेरून घोषणा देऊन आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसत आहे.
इंटरनेट बंद
आंदोलनांसंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मिडियाचा उपयोग आंदोलकांकडून केला जात आहे. मात्र, सरकारने इंटरनेट बंद करण्याचा आदेश अनेक शहरांमध्ये दिला आहे. लोकांना सहजगत्या एकमेकांशी संपर्क करता येऊ नये यासाठी सर्व प्रयत्न प्रशासन करीत आहे.
तिनायामेनची पुनरावृत्ती होणार ?
प्रशासकीय धोरणाविरोधात आंदोलन मोडून काढण्याचा चंग चीन सरकारने बांधला असून यातूनच तिनायामेन चौकात काही दशकांपूर्वी झालेल्या भीषण हत्याकांडाची पुनरावृत्ती होईल काय अशी भीती व्यक्त होत आहे. लोकशाहीच्या स्थापनेसाठी आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर रणगाडे घालून त्यांचा चेंदामेंदा करण्याचा प्रकार चीन प्रशासनाने तिनायामेन चौकात 1989 मध्ये केला होता. दहशतीच्या मार्गाने ते आंदोलन मोडून काढण्यात आले होते. तसाच प्रकार आताही केला जाईल अशी शक्यता अनेकजण व्यक्त करीत आहेत.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून शनिवारी या वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सावध झाले असून शून्य कोरोना धोरण निर्दयपणे लागू करण्यात आले आहे. भारतासह जगात कोरोनाची तीव्रता आता बरीच कमी होत असताना चीनमध्ये मात्र तो मोठय़ा प्रमाणात डोके वर काढीत आहे. त्यामुळे प्रशासन धास्तावल्याचे दिसून येत आहे.