ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा तिहार तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जैन तुरूंग अधिकारी अजित कुमार (Ajit Kumar) यांच्यासोबत कोठडीत बराच वेळ चर्चा करताना दिसत आहेत. जैन यांचे आतापर्यंत तुरूंगातील तीन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमुळे जैन यांना तुरूंगात VIP वागणूक मिळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणात ते सध्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. मसाज आणि हॉटेलमधील जेवणासंदर्भातील व्हायरल व्हिडिओनंतर तुरुंगातील सात नंबरच्या सेलमध्ये ते सुखासीन आयुष्य जगत असल्याचा आरोप होत होता. आता तिसऱ्या व्हायरल व्हिडिओत जैन आपल्या कोठडीत काही लोकांशी चर्चा करतात. त्यानंतर तुरूंग अधिकारी अजित कुमार यांच्याशी ते बराच वेळ चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे कोठडीत तुरुंग अधिकाऱ्यासोबत अशी कोणती व्हीआयपी चर्चा सुरू होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी जैन यांचे तुरुंगातील दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामधील एका व्हिडिओत जैन यांची कोठडीत एकजण आरामात मसाज करत असल्याचे दिसत होते. तर दुसऱ्या व्हिडिओत जैन कोठडीत हॉटेलमधील जेवण जेवताना दिसत होते. तसेच ते फळं खाताना दिसत होते.
अधिक वाचा : जेलमध्ये मंत्र्यांची मजा! सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल