संजय पाटील / हातनूर
तासगाव तालुक्यातील विसापूर येथील तिघांची कृषी अधिकारी पदी नुकतीच निवड झाली. राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे यात दोन तरुणींनी बाजी मारली. तिघेही सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या निवडीने गावात अधिकारी होण्याचा सिलसिला अखंडपणे सुरूच आहे. कु. कोमल बाळासाहेब माने, कु. संयोगिता संजय जाधव व राहुल नारायण माने अशी तीन य़शस्वी उमेदवारांची आहेत. या तिघांसह गावात आतापर्यंत एकूण २४ जण अधिकारी पदावर पोचले. दरम्यान या तिघांचेही गावकऱ्यांनी कौतुक केले. तिघेही कृषी पदवीधर आहेत.
या तिघांपैकी संयोगिता संजय जाधव यांची गेल्या वर्षीच कृषी अधिकारी म्हणून कॅनरा बँकेत निवड झाली होती. तर गेल्याच महिन्यात कु. कोमल माने व राहुल माने हे याच पदावर निवडले गेले. विशेष म्हणजे संयोगिता हिची बहिण डॉक्टर आहे. तर कोमलची बहिण उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करते. त्यामुळे आता गावातील मुली हळूहळू मुलांच्या पुढे एक पाऊल टाकत असल्याचे चांगले चित्र पाहायला मिळत आहे.
संयोगिता हीचे वडील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात. तर कोमल ही एस.टी.चालकाची मुलगी आहे. तिचे वडील श्री. बाळासाहेब तासगाव आगारात चालक म्हणून काम करतात. श्री बाळासाहेब यांच्या दोन्ही मुली चांगल्या पदावर पोहोचल्या आहेत.
राहुल हा येथील नारायण शिवाजी माने यांचा मुलगा आहे. एका शेतकरी कुटुंबातील या मुलाने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे शेती कामात मदत करत राहुलने हे यश संपादन केले. त्यामुळे त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. निवड झालेल्या तिघांचेही गावात व पंचक्रोशीतील गावातून कौतुक होत आहे.