कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब वाहू लागले आहे. परिणामी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नदी काठच्या नागरीकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज सकाळी विशाळगडावर जात असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज ढासळला आहे. त्यामुळे लोखंडी जिन्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी वाटेने नागरीकांनी गडावर प्रवेश करावा अशा सूचना शाहुवाडी पोलीसांनी दिल्या आहेत.
विशाळगडाला ऐतिहासिक महत्व आहे. हा प्राचिन किल्ला कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याचा सिध्दी जोहरचा वेडा फोडून विशाळगडाचा आधार घेतला होता. गजापूर या गावापासून सुमारे चार किलो मीटरच्या अंतरावर पावनखिंड आहे. याच पावनखिंडीत नववीर बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 मावळ्यांच्या साह्याने पराक्रम मिळविला होता.
हेही वाचा- Kolhapur Rain Update: इचलकरंजीत जुना पूल पाण्याखाली; हुपरी मार्ग बंद होण्याची शक्यता
सिद्धी जौहरच्या सैन्याला बाजी प्रभू देशपांडे यांनी मोठ्या धीराने आणि शौर्याने थोपवून धरले होते. तोफांचा आवाज कानी पडताच वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले.व त्यांच्या वीर मरणा नंतर विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या देहाचा अंत्य संस्कार केला होता.
गेल्या काही दिवसापूर्वी पन्हाळ्याचा रस्ता खचला होता. यामुळे पन्हाळ्याचा बुरुज ढासळणार असल्य़ाचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. याठिकाणी रस्त्याचे कामही सुरु आहे. दरम्यान आज विशाळगडाचा बुरुज ढासळला असल्याने प्रशासनाने याची डाकडुजी करावी अशी नागरीकांनी मागणी केली आहे.


previous post