ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तामिळनाडूचा 18 वर्षीय टेबल टेनिसपटू (table tennis) विश्वा दीनदयाल (vishwa deenadayalan) यांचा रविवारी अपघातात (accident) मृत्यू झाला. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पयिनशीपमध्ये भाग घेण्यासाठी तो आपल्या सहकाऱ्यांसह गुवाहाटीवरुन शिलांगकडे टॅक्सीने जात होता. त्यावेळी त्यांच्या टॅक्सीला भीषण अपघात झाला. यात विश्वाचा मृत्यू झाला. तर त्याचे तीन सहकारी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने (TTFI) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
TTFI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमली चेक पोस्टनंतर विरुद्ध दिशेने येणारा 12 चाकी टेलर शांगबंगला येथे रस्ता दुभाजकाला धडकल्यानंतर विश्वा यांच्या टॅक्सीला धडकला. यात टॅक्सी चालकाला जागीच प्राण गमवावे लागले, तर विश्वाला नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेसमध्ये आणण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टॅक्सीमधील त्याचे सहकारी रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.