शिवप्रताप गरुडझेप चित्रपट 5 रोजी प्रदर्शित
जगन्नाथ मुळवी /मडकई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या इतिहासावर आधारीत ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात फौलाद खानाचा अभिनय गोव्याचे प्रतिभावंत नट विश्वजीत फडते यांनी साकारला असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यूटयुबवर या चित्रपटाच्या ट्रेलरला 15 लाखांहून अधिक प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे.
“आजसे इस हवेलीपर हमारे पेहरे रहेंगे, हम उम्मीद करते है के, आप हमारे लिये इमदाद होगे.’’ अशी बतावणी करणाऱया फौलाद खानचा क्रूरपणा विश्वजीत फडते यांनी आपल्या खास अभिनय शैलीतून साकारला आहे. मुंबईतील आयनॉक्स थिएटरमध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील काही मान्यवरांच्या उपस्थीतीत 5 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पुरंदरचा तह ही मुत्सदीपणाने महाराजांनी पत्करलेली हार होती की, माघार व त्यामागील आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण काय होते. त्यांच्या राजकारणामागील विविध कंगोरे कसे होते याचा उलगडा या सिनेमातून झालेला आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात फौलाद खानची नजाकत विश्वजीत फडते यांनी सुरेखरीत्या वठवलेली आहे. डोळे, बोलका चेहरा व चालण्याची लकब तसेच संवादफेकीच्या जोखडात प्रेक्षकांना अडकवून ठेवण्याचे सामर्थ्य दिसून येते. या निर्मीतीनंतर डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगंदबा क्रियेशतर्फे ‘वाघनखे’ व ‘वचपा’ या आणखींन दोन अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मीती करण्यात आली आहे. लवकरच त्यात औरंगझेबच्या मुख्य भूमीकेत विश्वजीत फडते झळकणार आहेत. ऐतिहासिक व पौराणिक मालिकांमधून उत्कृष्ट अभिनय करुन रसीक मनांवर अधिराज्य गाजवणाऱया मडकई येथील या तरुण नटाला समाज माध्यमांवर असंख्य चाहत्यांकडून दाद मिळत आहे.
शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाचे चित्रीकरण दादासाहेब फाळके फिल्म सीटी बरोबर प्रत्यक्ष लाल किल्यावर झाले आहे. एकूण दोन महिन्यात या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले. गोव्यात वास्तव्य व नोकरी करुनही मुंबईच्या एकापेक्षा एक सरस मराठी मालिकांमधून आणि आता सिनेमातून सातत्याने कलेचा अविष्कार घडवीणाऱया विश्वजीत फडते यांनी महाराट्राबरोबर गोव्यातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. “स्वराज्य रक्षक संभाजी’’ या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत मराठी मालीकेतून त्यांनी उंत्तुग अभिनय शैलीतून रंगवलेला सिद्दी खैरात अजून रसिकांच्या मनावरुन पुसलेला नाही. ‘दख्खनचा राजा’ मधील ज्योतीबा, ‘विठ्ठू माऊली’ मधून दिंडीसूर, ‘जय मल्हार’ मधून ताराकसूर अशा भूमिका मराठी मालिकांतून त्यांनी साकारल्या. यापूर्वी ‘स्टार प्रवाह’, ‘ई टिव्ही’, ‘झी मराठी’, ‘कलर्स’ या वाहिन्यांवरुन प्रसारीत होणाऱया ‘राजा संभाजी’, ‘बाजीराव पेशवे मस्तानी’, अशा अनेक मालिकांतून अभिनय केला आहे. गोवा ते महाराष्ट्र असा त्यांचा सातत्याने कलेसाठी होणारा प्रवास व त्यामागची धावपळ पाहिल्यास ते निश्चीतच कौतुकास्पद आहे.
गोवा तसेच गोव्याबाहेर अनेक नाटकांतून विश्वजीत फडते यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. गोव्यातील पहिले महानाटय़ व महाराष्ट्रातही अनेक प्रयोग लावून लोकप्रिय ठरलेले ‘संभवामी युगे युगे’ या नाटकातील कंसाच्या भूमीकेतून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. ज्येष्ठ साहित्यिक स्व. विष्णू सूर्या वाघ यांच्या ‘अलख निरंजन’ या नाटकांतून त्यांनी केलेली शंकराची भूमिका संस्मरणीय ठरली. मडकई गावात होणाऱया अनेक उत्सवी नाटकांतून त्यांनी विविध भूमिका केल्या. दिग्दर्शनाची बाजूही ते साभांळतात. कुटुंब, नोकरी व कला आणि सामाजीक कार्यात अभिरुची अशा संगमातून त्यांचा हा जीवन प्रवास चालेला आहे. आर्थिक सुबत्तेच्या हव्यासापोटी आपला जीवन प्रवास नसून केवळ कलेतून माणसे जोडण्यासाठी असल्याची ते प्राजंळ कबुली देतात….!
सुदिन ढवळीकर यांच्याकडून विश्वजित फडते यांचे अभिनंदन


‘छत्रपती शिवाजी महाराजांवर’ निस्सीम प्रेम व त्यांच्या विचारसरणीतून राजकारणात काम करणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विश्वजीत फडते यांचे अभिनंदन केले आहे. मडकई मतदार संघातील हा कलाकार कलेच्या विश्वात अज्ररामर ठरावा अशा शुभेच्छा मंत्री ढवळीकर यांनी त्यांना दिल्या. शिवप्रताप गरुडझेप या सिनेमातून शिवाजी महाराजांचा मुत्सदीपणा व राजकारणातील डावपेचांचे विविध कंगोर पाहण्यासाठी व मुबंईतून मिळालेल्या आमंत्रणाला मान देऊन या प्रदर्शन सोहळय़ाला आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी दिवाळी सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत युवा पिढीसाठी नाटय़कार्य शाळा घेण्याचा मानस आहे. माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत पातळीवर या नाटय़प्रशिक्षणाचे धडे दिले जातील. अंत्रुज महालातील ज्येष्ठ कलाकारांना युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणले जाईल व त्यातून झालेल्या नाटय़निर्मीचा प्रयोगही प्रत्येक पंचायत पातळीवर सादर केला जाईल.