दोन दिवस भरगच्च कार्यक्रम : आज शहरांमध्ये निघणार फेरी, 24 देणगीदारांच्या फोटोचे अनावरण करून त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
कन्याकुमारीपासून बद्रीनारायणपर्यंत आणि काश्मीरपर्यंत जी अनेक मंदिरे, शिल्पकला, मूर्त्या विश्वकर्मा आणि त्यांच्या वारसदारांनी निर्माण केल्या आहेत. प्राचीन शिल्पी जकणाचारीपासून आतापर्यंतच्या आधुनिक शिल्पकारांपर्यंत सर्व जगाची सेवा करणारा समुदाय म्हणजे विश्वकर्मा समुदाय होय, असे विचार विश्वकर्मा जगद्गुरु पीठ महासंस्थान मठ अरेमदनहळळी, ता. हसनचे प्रमुख स्वामी श्री श्री श्री शिवसुज्ञानतीर्थ यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या संस्थेचा अमृतमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त 16 व 17 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास परमपूज्य श्री श्री श्री शिवसुज्ञानतीर्थ स्वामीजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर खासदार मंगला अंगडी, भाजप नेते शंकरगौडा पाटील, कर्नाटक राज्य विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष बाबू पत्तार, सार्वजनिक वाचनालय आणि पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड, बेळगाव ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय कदम, विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष भारत रामचंद्र शिरोळकर व बिल्डर एन. एस. शंकराचार्य आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि 75 वर्षांत आम्ही 75 संस्था एकत्र आलो आहोत आणि लवकरच एक शैक्षणिक संस्था निर्माण करणार आहोत, असे सांगितले. त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार अंगडी यांनी या उपक्रमाबद्दल समाजाचे कौतुक केले आणि समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली.
बेंगळूरमध्ये समाजाचा घेणार मेळावा
यावेळी बोलताना बाबू पत्तार म्हणाले की, 30 ते 35 लाख लोकसंख्या असलेला पण एकी नसल्याने एकमेकापासून दूर राहिलेला विश्वकर्मा समाज हा बुद्धिवंत आहे. लवकरच बेंगळूरमध्ये समाजातील एक लाख लोकांचा मेळावा भरविण्याची आमची योजना आहे, असे सांगून त्यांनी संस्थेसाठी कार्य केलेल्या सर्वांचे कौतुक केले.
प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अनंत लाड यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी विजय कदम, महांतेश यांचीही भाषणे झाली.
सूत्रसंचालन करून किसन ठोकणेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास बेळगाव जिह्याच्या विविध भागातून विश्वकर्मा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या सर्वांच्या हस्ते स्वामीजींचा सन्मान करण्यात आला. दरम्यान सकाळच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यावर 1962 साली संस्थेला जागा खरेदी करण्यासाठी देणगी दिलेल्या 24 देणगीदारांच्या फोटोचे अनावरण व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश शिरोळकर यांनी दीपप्रज्वलन करून संस्थेस मूर्तीसाठी एक किलो चांदी देण्याचे जाहीर केले. दुपारी प्रभू विश्वकर्मा मूर्तीला अभिषेक व पूजन स्वामीजींच्या हस्ते झाल्यावर त्यांची पाद्यपूजा करण्यात आली.
दुपारी कार्यक्रमानंतर महाप्रसाद झाला. त्यानंतर बेळगाव आणि परिसरातील सर्व विश्वकर्मा मंडळांचा सत्कार आणि सायंकाळी हुदलीकर यांचा भक्तीगीते गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री नावगे येथील भजनी मंडळाच्यावतीने भजन, कीर्तन झाले.
शनिवारी उत्तर भारतीय विश्वकर्मा विश्वकर्मा प्रकट दिनाप्रित्यर्थ मूर्ती अभिषेक, होम हवन, पूजा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर समाजबांधवांची शहरांमध्ये फेरी निघणार आहे. दुपारी बारा वाजता विश्वकर्मा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले आहे.