ट्रम्प गट चिंतेत : अध्यक्षाशिवाय अन्य पद स्वीकारणार नसल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमरिकेत अध्यक्षीय पदासाठी रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांच्या शर्यतीत भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी वेगाने लोकप्रिय होत आहेत. इमर्शन कॉलेजच्या नव्या सर्वेक्षणानुसार फ्लोरिडाचे गव्हर्नर रोन डी-सेंटिस यांच्या तोडीच्या स्वीकारार्हतेनजीक ते पोहोचले आहेत. रामास्वामी आणि डी-सेंटिस हे प्रत्येकी 10 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 56 टक्के मतांसह पहिल्या स्थानावर आहेत. जून महिन्यात ट्रमप यांना 59 टक्के मते, डी-सेंटिस यांना 21 तर पेन्स यांना 6 टक्के जणांचे समर्थन प्राप्त होते. तर रामास्वामी यांना केवळ 2 टक्के रिपब्लिकनांचे समर्थन मिळाले होते. त्यानंतरच्या कालावधीत रामास्वामी यांच्यासाठीच्या समर्थनार्थ 8 टक्के वाढ झाली आहे. तर डी-सेंटिस यांना 11 टक्के आणि ट्रम्प तसेच पेन्स यांच्या समर्थनात 3 टक्क्यांची घट झाली आहे.
रामास्वामी यांनी डी-सेंटिस यांच्याइतके समर्थन मिळविल्याने आणि ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याने रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीसाठी मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. 2024 च्या अध्यक्षीय पदासाठी उमेदवारी प्राप्त करण्यास अपयशी ठरल्यास अन्य कुठल्याही पदाच्या शर्यतीत राहणार नसल्याचे रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या पदावर राहण्यापेक्षा खासगी क्षेत्रात काम करणे पसंत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जीओपी प्रेसिडेंशियल प्रायमरी
2007 मध्ये हेज फंड कंपनी क्यूवीटी फायनान्सशी रामास्वामी जोडले गेले होते. 2014 मध्ये अडव्हान्स मेडिसीनवर काम करणारी कंपनी रोइवेंट सायन्स त्यांनी स्थापन केली. 2015 मध्ये रोइवेंटच्या सहाय्यक कंपनीने अमेरिकेच्या फार्मा क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ सादर केला होता. प्रोस्टेट कॅन्सर आणि ओव्हरअॅक्टिव्ह ब्लेडरसाठीची अनेक औषधे या कंपनीने तयार केली आहेत. 2016 मध्ये रामास्वामी हे 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये सामील झाले होते. 2021 मध्ये त्यांनी रोइवेंटचे सीईओपद सोडत वोक इंक आणि नेशन ऑफ व्हिक्टीम या पुस्तकांचे लिखाण केले होते.
अमेरिकेला वैभव मिळवून देणार
रामास्वामी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन् चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या मताचे समर्थक आहेत. अमेरिका फर्स्ट धोरणाला ट्रम्प यांच्यापेक्षा पुढ नेण्याचे काम मी करणार असल्याचे रामास्वामी सांगतात. त्यांनी स्वत:च्या प्रचारासाठी 125 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले आहे.