प्रतिनिधी/ नवी दिल्ली
भारत सरकार आता तोटय़ात चालणारी कंपनी व्होडाफान-आयडियामधील सर्वात मोठी समभागधारक बनणार आहे. दूरसंचार कंपनीने म्हटले आहे की, व्होडाफोन आयडियामध्ये सरकार 33.44 टक्के हिस्सेदारी घेणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवारी समभाग वाटप करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले जाते.
कंपनीच्या थकबाकी स्पेक्ट्रम पेमेंटवरील व्याज आणि थकबाकी एजीआरचे एनपीव्ही समभागात रुपांतरित केल्यामुळे हा हिस्सा सरकारकडे येणार आहे. ब्रोकरेज सीएलएसएचा अंदाज आहे की व्होडाफोन आयडियाचे सह-प्रवर्तक युकेचे व्होडाफोन पीएलसी आणि भारताचे आदित्य बिर्ला ग्रुप यांचे व्होडाफोनमध्ये अनुक्रमे 31.7 टक्के आणि 18.2 टक्के स्टेक असतील.
बोर्डाने दिली मंजुरी
बोर्डाच्या झालेल्या बैठकीत प्रत्येकी 10 रुपयांच्या इश्यू किमतीवर प्रत्येकी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या 16,133,184,899 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती कंपनीने मंगळवारी संध्याकाळी बीएसई फाइलिंगमध्ये दिली आहे. या वाटपानंतर कंपनीतील सरकारची हिस्सेदारी 33.44 टक्क्यांवर पोहचणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीला मोठी मदत मिळेल
नितीन सोनी, जागतिक रेटिंग एजन्सी फिचचे वरिष्ठ संचालक (कॉर्पोरेट्स) म्हणाले, सरकार आणि व्होडाफोन आयडिया यांच्या या निर्णयामुळे कर्जदारांना व्होडाफोनच्या विद्यमान बँक कर्जांचे पुनर्वित्त करण्यास प्रोत्साहन मिळेल. मात्र, टेलिकॉम कंपनीची कमकुवत आर्थिक स्थिती लक्षात घेता ते नवीन कर्ज देऊन धोका पत्करणार नसल्याचे समजते.