मतदानाची पद्धती निर्वाचन अधिकारी ठरविणार, नवीन अधिकाऱयाची नियुक्ती बनली चर्चेचा विषय
प्रतिनिधी /मडगाव
पालिका प्रशासन संचालक (डीएमए) गुरुदास पिळर्णकर यांनी शुक्रवार 23 रोजी मडगावचे नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक बोलाविली असून यासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून एका नवीन अधिकाऱयाची नियुक्त करण्यात आलेली असल्याने तो चर्चेचा विषय ठरला ?आहे. अविश्वास ठरावावर चर्चा कशी करायची, हात उंचावून की, गुप्त मतदानाद्वारे हे निर्वाचन अधिकारी ठरवतील, असे पालिका संचालकानी स्पष्ट केले आहे.
16 सप्टेंबरच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी डीएमएने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांची नियुक्ती केली होती, तर आता अतिरिक्त सचिव (वित्त) विकास गावणेकर यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी निदर्शनास आणून दिले आहे की, पालिकेच्या इतिहासात कदाचित प्रथमच सचिवालयालातील अधिकाऱयाला निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डीएमएकडे श्रीनेत कोठावळे यांची नियुक्ती करू इच्छित नसल्यास दक्षिण गोव्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी-3 परेश फळदेसाई किंवा अन्य अधिकाऱयांचे पर्याय उपलब्ध होते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
मागील शुक्रवारी झालेल्या मडगाव पालिका नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आमदार दिगंबर कामत आणि भाजपाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा स्वतंत्र उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी पराभव केला होता. घनश्याम यांचा 15 विरूद्ध 10 मतांनी विजय झाला होता. या निकालामुळे आमदार कामत आणि भाजपाला धक्का बसला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेले असूनही हा धक्कादायक निकाल आला होता. गोवा फॉरवर्डचे 8 नगरसेवक तसेच भाजप गटातील नगरसेविका सुनीता पराडकर उघडपणे घनश्याम शिरोडकर यांच्यामागे राहिल्याने त्यांच्याकडे 10 नगरसेवकांचे पाठबळ होते. मात्र त्यांना अतिरिक्त चक्क 5 मते पडल्याने भाजपाची 5 मते फुटल्याचे उघड झाले होते. त्यानंतर लगेच भाजप नगरसेवकांना पणजीत बोलावून त्यांच्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर सहय़ा घेण्यात आल्या होत्या तसेच त्यांना जांबावलीतील श्री दामोदर संस्थानात नेऊन प्रमाण करून घेण्यात आले होते.
नगराध्यक्षपद वाचविण्यासाठी गरज आणखी तीन नगरसेवकांची
मडगाव पालिका 25 सदस्यांची असून बहुमतासाठी ?13 नगरसेवकांच्या पाठबळाची अ?ावश्यक आहे. सध्या गोवा फॉरवर्डचे 8, भाजपातून गोवा फॉरवर्ड गटाकडे आलेल्या एक नगसेविका आणि नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर असे 10 जणांचे संख्याबळ सत्ताधारी गटाकडे आहे. भाजपकडे एकूण 15 नगरसेवक आहेत. यातील पाच जण फुटल्याने घनश्याम यांचे फावले होते. आता किमान तीन नगरसेवकांची गरज त्यांना खुर्ची सांभाळण्यासाठी लागणार आहे. ती कशी मिळतील यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. मतफुटीचा त्यांना पुन्हा फायदा होईल काय असे प्रश्न चर्चेत असला, तरी जास्त करून हात उंचावून अविश्वास ठरावावर मतदान होत असल्याने उघडपणे आता कोणी तसे करण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपातील तीन नगरसेवकांना फोडून आणण्याशिवाय घनश्याम शिरोडकर यांना आपले पद वाचविता येणार नसून ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.