चार जागांसाठी मतदान : 49 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार : तिन्ही राजकीय पक्षांमध्ये चुरस
प्रतिनिधी /बेंगळूर
कर्नाटक दक्षिण पदवीधर, वायव्य पदवीधर, पश्चिम शिक्षक आणि वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या चार विधानपरिषद जागांसाठी सोमवार दि. 13 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीतही राज्यातील तिन्ही राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असून जोरदार प्रचाराद्वारे प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत त्या-त्या मतदारसंघातील व्याप्तीमध्ये मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार दि. 13 जून रोजी विशेष सुटी मंजूर करण्याचा आदेश दिला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती बसवराज होरट्टी यांच्यासह 49 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याचबरोबर चार महिलादेखील ही निवडणूक लढवित आहेत. चार मतदारसंघांमध्ये एकूण 2,84,922 मतदार असून यात 1,81,773 पुरुष, 1,03,121 महिला आणि 28 इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदानासाठी एकूण 407 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून कर्मचारी मतदान केंद्रात रवाना झाले आहेत. 15 जून रोजी पश्चिम शिक्षक, वायव्य शिक्षक आणि वायव्य पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी बेळगावच्या ज्योती पदवीपूर्व कॉलेजमध्ये होणार आहे. तर दक्षिण पदवीधर मतदारसंघाची म्हैसूरच्या महाराणी महिला कॉलेजमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
दि. 4 जुलै रोजी विधानपरिषद सदस्य हणमंत निराणी, के. टी. श्रीकंठेगौडा, अरुण शहापूर, बसवराज होरट्टी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया चार जागांसाठी ही निवडणूक होत
आहे.
विधानसभेवरून विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळविला आहे. वायव्य पदवीधर मतदारसंघातून निजदने निवडणूक लढविलेली नाही. उर्वरित तिन्ही मतदारसंघात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपने चारही मतदारसंघातील निवडणूक लढविली आहे.
दक्षिण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसतर्फे मधु जी. मादेगौडा, भाजपकडून व्ही. रविशंकर, निजदतर्फे एच. के. रामू रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. वायव्य पदवीधर संघात काँग्रेसतर्फे सुनील अण्णप्पा संक, भाजपतर्फे हणमंत निराणी यांच्यासह 11 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. वायव्य शिक्षक संघात भाजपकडून अरुण शहापूर, काँग्रेसतर्फे प्रकाश हुक्केरी, निजदतर्फे चंद्रशेखर एसप्पा लोणी यांच्यासह 12 उमेदवार आहेत. पश्चिम शिक्षक संघात भाजपकडून बसवराज होरट्टी, काँग्रेसतर्फे बसवराज गुरीकार, निजदकडून श्रीशैल गडदीम्मी यांच्यासह 7 जण रिंगणात आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
शिक्षकसाठी गुलाबी, पदवीधरसाठी पांढरी मतपेटी
बेळगाव : वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून रविवारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱयांना येथील ज्योती कॉलेजमध्ये निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी एक तास वेळ वाढवून देण्यात आली आहे. वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी स्वतंत्र मतपेटय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी तर पदवीधर मतदारसंघासाठी पांढरी मतपेटी असणार आहे. मात्र, मतदान केंद्र एकच असणार आहे. बेळगाव तालुक्मयात काकती ग्राम पंचायत कार्यालय, हिंडलगा मराठी मुलांची शाळा,
शहरातील सरदार्स हायस्कूल, विश्वेश्वरय्यानगर येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळा, महांतेशनगर येथील उच्च प्राथमिक शाळा, हुदली येथील उच्च प्राथमिक शाळा, गणपत गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळा, कॅन्टोन्मेंट येथील इंग्रजी माध्यम शाळा, टिळकवाडी येथील आदर्श मराठी मुलांची शाळा क्र. 9, शहापूर येथील चिंतामणराव हायस्कूल, सांबरा येथील मराठी मुलांची शाळा या ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.
दहा कागदपत्रे दाखवून मतदान करता येणार
प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, पासपोर्टसह दहा कागदपत्रे दाखवून मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रांसंबंधी निश्चित माहिती मतदारांना त्यांच्या मोबाईलवर पोहोचविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान
सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेटय़ा ज्योती कॉलेज येथील मतमोजणी केंद्रावर आणण्यात येणार आहेत. बुधवार दि. 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात मद्यविक्री बंदीचा आदेश जारी केला असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.