8 डिसेंबरला मतमोजणी, निवडणूक आयोगाची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल शुक्रवारी वाजले. दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. वेळापत्रकानुसार 17 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. हिमाचल प्रदेशमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी सध्या गुजरातमधील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. गुजरातमधील निवडणुकांचा कार्यक्रमही येत्या काही दिवसात जाहीर केला जाऊ शकतो.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्यादृष्टीने आयोगाने रितसर कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 12 नोव्हेंबरला मतदान आणि 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 10 डिसेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नामांकन सुरू झाल्यापासून ते मतदानापर्यंतची प्रक्रिया 26 दिवसांत पूर्ण होईल, मात्र त्यानंतर मतमोजणीसाठी 26 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोना स्थितीबाबत सावधानता
आयोग अनेक दिवसांपासून निवडणुकीशी संबंधित प्रक्रियेत व्यग्र होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी आयोगाच्या अधिकाऱयांनी राज्यांच्या अधिकाऱयांशी दीर्घ चर्चा केली. सध्या कोरोना नियंत्रणात आहे, मात्र यासंदर्भात आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने राज्यांना दिला आहे. तसेच उमेदवारांना स्वतःवर नोंदवलेल्या सर्व प्रकारच्या खटल्यांची आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहिती द्यावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
सुसज्ज मतदान केंद्रे
प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा असणार आहे. तसेच मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर बांधण्यात येणार आहे. ठराविक मतदान केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी तैनात असतील. यामध्ये मतदान कर्मचाऱयांपासून सुरक्षा कर्मचाऱयांपर्यंत केवळ महिला अधिकारीच तैनात असतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असे किमान एक बूथ तयार करण्यात येणार आहे.
मतदारांसाठी हेल्पलाईन ऍप
मतदार हेल्पलाईन ऍप जारी करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. मतदारांना स्वतःची किंवा निवडणुकीबाबत कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर ती या ऍपवर उपलब्ध होईल. निवडणुकीतील उमेदवारांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मतदारांना ऍपवरून उपलब्ध होणार आहे. या माहितीमध्ये उमेदवारांची वैयक्तिक माहिती आणि राजकीय कारकीर्द समजून घेता येणार आहे.
मोफत योजनांच्या घोषणेवर नजर
निवडणूक प्रचाराच्या काळात विविध पक्षांच्या मोफत योजनांच्या घोषणेवरही निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यावेळी देखरेख अधिक कडकपणे ठेवली जाणार आहे. निवडणुकीतील मोफत आश्वासनांचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
मागील निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत
हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारीला संपत आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्यापैकी 20 जागा राखीव आहेत. 17 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि 3 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. 2017 मध्ये भाजपने पूर्ण बहुमताने विजय मिळवून सरकार स्थापन केले. निवडणुकीत भाजपला 44 तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. तसेच सीपीआय(एम) एक जागा जिंकली आणि दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण?
विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे पुढील कारकिर्दीसाठीही भाजपचे सर्वात मोठे दावेदार आहेत. 2017 सारखा मोठा फेरबदल झाला तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनू शकतात. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्ष वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. वीरभद्र सिंह यांचे 2021 मध्ये निधन झाले. यावेळी काँग्रेसमध्ये अनेक दावेदार असले तरी एकाही नावावर एकमत नाही. काँग्रेसकडून मुकेश अग्निहोत्री, कौल सिंह ठाकूर, सुखविंदर सिंग सुखू, रामलाल ठाकूर, आशा कुमारी यांची नावे दावेदारांच्या यादीत समाविष्ट आहेत.
आतापर्यंत प्रचारात भाजपची आघाडी
हिमाचलमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या 17 दिवसांत पंतप्रधानांनी आतापर्यंत चार सभा घेतल्या आहेत. येथे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनीही शुक्रवारी शिमल्याच्या सोलनमध्ये सभा घेतली. आता निवडणूक प्रचारकाळातही जाहीर सभांमध्ये त्या सक्रीय सहभाग घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.