भारत समर्थक शेर बहादूर देउबा यांची के. पी. शर्मा ओली यांच्याशी लढत
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये रविवारी संसद आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी एकाचवेळी मतदान सुरू होते. विद्यमान पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या नेपाळी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये लढत होत आहे. नेपाळच्या संसदेच्या एकूण 275 जागांसाठी आणि प्रांतीय विधानसभेच्या 550 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2015 मध्ये जाहीर झालेल्या नव्या संविधानानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. देशातील 1 कोटी 80 लाखांहून अधिक मतदार नवे सरकार निवडत असून त्याचा निकाल आठवडाभरात येण्याची अपेक्षा आहे.
नेपाळमधील निवडणुकांकडे भारताचेही डोळे लागलले आहेत. भारत आणि नेपाळमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारतप्रेमी नेता निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यमान पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे भारत समर्थक म्हणून ओळखले जातात. तर, के. पी. शर्मा हे चीनचे समर्थक असल्याचे मानले जाते. के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या प्रचारात भारत आणि नेपाळमधील कालापानी प्रादेशिक वाद उपस्थित केला होता. वास्तविक नेपाळ हा भारताचाच शेजारी नसून चीनचाही शेजारी आहे. चीनला नेपाळच्या भूमीचा वापर करून भारताला चारही बाजूंनी घेरायचे आहे. अशास्थितीत देउबा निवडून येणे भारताच्यादृष्टीने योग्य मानले जाते.
नेपाळमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये भारताचीही मदत महत्वाची मानली जाते. कोणत्याही अडथळय़ाशिवाय येथे मतदान व्हावे यासाठी भारताने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. नेपाळसोबतच्या भारत आणि चीनच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नेपाळशी बिहार आणि उत्तर प्रदेशची लांब सीमा आहे. येथून दोन्ही देशांचे लोक व्हिसा आणि पासपोर्टशिवाय प्रवास करू शकतात.
राजकीय पक्षांमध्ये मतभेद
अमेरिका आणि चीनकडून मिळणाऱया आर्थिक मदतीवरून नेपाळच्या राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत. देउबा यांच्या पक्षाने अमेरिकन मिलेनियम चॅलेंज कोऑपरेशन अंतर्गत 42 हजार कोटी रुपयांची मदत स्वीकारली आहे. तर के. पी. शर्मा ओली यांचा पक्ष चीनसोबतच्या बीआरआय करारासाठी अधिक उत्सुक दिसतो. छोटय़ा पक्षांनी विदेशी मदतीबाबत निवडणूक प्रचारात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.