शांताराम कोलवेकरांच्या घरवापसीमुळे भाजपा निर्धास्त
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी शुक्रवार 9 रोजी पालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. 15 पैकी 8 सदस्यांनी हा अविश्वास दाखल केला आहे. मात्र त्यापैकी शांताराम कोलवेकर हे पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्याने हे अविश्वास नाटय़ कितपत यशस्वी होईल, याबद्दल साशंकता आहे.
गेल्या 24 नोव्हेंबर रोजी रितेश नाईक यांच्याविरुद्ध अविश्वास नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामध्ये नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक, प्रदीप नाईक, विलीयम आगियार, शांताराम कोलवेकर, गिताली तळावलीकर, जया सावंत, अमिना नाईक व सिमा फर्नांडिस या आठजणांचा समावेश आहे. शनिवारी या सत्ताबदलाच्या नाटय़ाला कलाटणी मिळाली. अविश्वास दाखल करणाऱयांपैकी नगरसेवक शांताराम कोलवेकर यांनी आपल्या भूमिकेशी फारकत घेत भाजपामध्ये घरवापसी केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थितीत कोलवेकर यांची ही घरवापसी झाली. यावेळी फोंडय़ाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी, नगरसेवक आनंद नाईक व इतर भाजपा नगरसेवकांच्या साक्षीने ‘हम साथ साथ है’ असे जाहीर करीत कोलवेकर यांनी अविश्वास नाटय़ातील हवाच काढून घेतली. त्यामुळे हे मतदान निव्वळ औपचारिकपणा ठरेल की विरोधक अजून कुठली नवीन चाल खेळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.