देशात सात जागांसाठी पोटनिवडणूक
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll) आज मतदान होत आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर लढत आहे. मात्र भाजपने उमेदवार मागे घेतल्याने आता निव्वळ औपचारिकता उरली असली तरी नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच एका विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याशिवाय शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या बालेकिल्ल्यात मतदान होत आहे. ठाकरेंनी अंधेरीत दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतली असून शिंदे गटानंही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे.
दरम्यान, आज भारतातील सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना हरवून बढत मिळवण्याची मोठी संधी भाजपकडे आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विस्तारवादासमोर पोटनिवडणुका जिंकून आस्तित्त्व वाचवण्याचा प्रयत्न अनेक प्रादेशिक पक्ष करताना दिसणार आहे. त्यामुळं सहा राज्यांतील सात विधानसभेच्या मतदानाकडे आणि त्याच्या निकालाकडे देशाचं लक्ष असणार आहे.
कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक?
आज महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, बिहारमधील मोकाम, गोपाळगंज आणि ओडिशातील धामनगर या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. भाजपला हरियाणात कॉंग्रेस, भाजपला यूपीत समाजवादी पार्टी, तेलंगणात टीआरएस, बिहारमध्ये आरजेडी, ओडिशात बिजू जनता दल आणि महाराष्ट्रात शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांचं कडवं आव्हान राहणार आहे.