155 मतदान केंद्रावर होणार मतदान
प्रतिनिधी/ सातारा
सर्व जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दि. 3 रोजी 155 मतदान केंद्रावर होत आहे. 21 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी व 9 मतदानाकरता कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानास उद्या सकाळी 7 वाजता मतदानाच प्रारंभ होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनाहेर माळी यांनी दिली. दरम्यान, किसन वीर बचाव पॅनेलचे आमदार मकरंद पाटील आणि किसन वीर शेतकरी पॅनेलचे चेअरमन मदन भोसले यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सोशल मीडियावरही चांगलीच राळ उडाली. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्यात अरेतुरेवर दोन्ही पॅनेलकडून वातावरण बनले गेले होते.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही मंगळवार दि. 3 रोजी 155 मतदान केंद्रावर होत आहे. त्याकरता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष व 7 मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे कर्मचारी नेमले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी, 17 झोनल अधिकारी आहेत. त्यांच्यासमवेत प्रत्येक एक पोलीस कर्मचारी तर कार्यालयात तीन कर्मचारी असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 155 मतदान केंद्रापैकी 21 मतदान केंद्रे ही संवेदनशील ओळखली जातात. त्या केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित आहे. 52 हजार 90 मतादर आहेत. त्यामध्ये रांजणी 1, शेंद्रे 1, यवतेश्वर 1, वेचले 1, हरचंदी 1, मुकवली 1, दुंद 1, आसली 1, तांबी 1, गोंदेमाळ 1, घरातघर 1, वरोशी 1, धावली 1, आसगाव 1, वेरुळी 1, लिंबाचीवाडी 1 या गावात एकच मतदार आहेत ते नजिकच्या मतदान केंद्रावर मतदानांचा हक्क बजावतील. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व तयारी करुन ठेवली आहे, असेही माळी यांनी सांगितले.
दोन्ही पॅनेलचे नशिब होणार उद्या मतपेटीत बंद
या निवडणूका बॅलेट पेपरवर होत आहेत. मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत आरोप प्रत्यारोप दोन्ही पॅनेलकडून सुरु होते. एकेरी भाषेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु होत्या. सोशल मीडियावरही जोरदारपणे आरोपप्रत्यारोप सुरु होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदान किती टक्के होईल, आणि कोण जिंकेल याचीच अंदाज सुरु झाले आहेत.