पुणे / प्रतिनिधी :
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी 7 ते सायंकळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
कसब्यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. कसब्यामध्ये भाजपने हेमंत रासने यांना, तर महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना तर, महाविकास आघाडीने नाना काटे यांना निवडणूकीमध्ये उतरविले आहे.
कसबा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेले 30 वर्षे कसब्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, यावेळेस काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळय़ा प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत पहायला मिळणार आहे. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.