22 केंद्रांवर होणार मतदान : 175 कर्मचारी नियुक्त : सकाळी 8 ते 5 या वेळेत होणार मतदान
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी (‘कोजिमाशि’) पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (9 रोजी) सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. कोल्हापूर येथील पदमाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 11 तर न्यू हायस्कूलमध्ये 11 अशा 22 केंद्रावर मतदान होणार आहे. 175 कर्मचारी नियुक्त केले असून 8 हजार 526 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रविवारी (10 रोजी) सकाळी 8 वाजता रमणमळा येथे मतमोजणी सुरु होणार आहे.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत चुरशीचा दुरंगी सामना होत असून 21 जागांसाठी पाच अपक्षांसह 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या विरोधात राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीमध्ये चुरशीचा दुरंगी सामना रंगला आहे. प्रचारामध्ये दोन्ही आघाडीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ‘कोजिमाशि’ पतसंस्थेवर गेल्या 18 वर्षांपासून दादा लाड यांचे वर्चर्स्व आहे. ठेवींची दुपट्टीहून अधिक वाढलेली संख्या, शेअर्स रकमेवर सुमारे 20 ते 25 टक्के दिला जाणारा लाभांश, कर्जदार मयत सभासदाची कर्जमाफी, दिपावली भेट ,अपघात विमा योजना आदी कामांची पोचपावती सभासदांसमोर ठेवून सत्ताधारी आघाडीकडून मतांचे दान मागितले जात आहे. तर विरोधी आघाडीकडून पतसंस्थेत भरमसाठ कर्मचारी भरती केल्याचा आरोप केला जात आहे. कर्जाचा व्याज दर एकअंकी तर ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देणार असल्याचे सभासदांना पटवून दिले जात आहे. त्याचबरोबर लाड यांची एकाधिकारशाही मोडून काढून बँक सभासदांच्या मालकीची करावी असे निर्वाणीचे आवाहन विरोधी आघाडीकडून केले जात आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील घडामोडी पडद्यावर
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ‘कोजिमाशि’ चे कारभारी दादा लाड यांनी आमदार जयंत आसगावकर यांना पराभूत करण्यासाठी अंतर्गत पातळीवर विरोधकांशी कसा समेट केला ? त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याबाबत कोणती वक्तव्ये केली ? आदी पडद्याआड राहिलेल्या बाबी विरोधकांनी गेल्या काही दिवसांत पडद्यावर आणल्या आहेत. कोजिमाशि पतसंस्थेच्या निवडणुकीतून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील कुरघोडीचे राजकारण सभासदांसमोर आणले गेले. त्यामुळे जाणकार गुरुजी कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार हे रविवारी स्पष्ट होणार आहे.