द्रौपदी मुर्मूंची यशवंत सिन्हा यांच्याशी थेट लढत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या पुढील राष्ट्रपतांसाठी सोमवार दि. 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. दिल्लीतील संसद भवनासह विविध राज्यांच्या विधिमंडळात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असून देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे. एकीकडे एनडीएकडून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुर्मू विरुद्ध सिन्हा अशी थेट लढत होत आहे. सद्यस्थितीत एनडीएतील मित्रपक्षांसह अन्य काही प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत आहे. सिन्हा यांना विरोधकांचा पाठिंबा असला तरी मतांची एकंदर जुळवाजुळव त्यांना विजयापर्यंत नेईल, अशी शक्यता कमीच दिसत आहे.
यशवंत सिन्हांना ‘आप’चा पाठिंबा
दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे दिल्लीतून तीन आणि पंजाबमधून 7 असे एकंदर दोन राज्यांतून 10 खासदार आहेत. तसेच, पक्षाचे पंजाबमध्ये 92, दिल्लीत 62 आणि गोव्यात दोन आमदार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘आप’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठक शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा झाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सामूहिक मतदानाचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पक्ष पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया, पंकज गुप्ता, राघव चड्डा, आतिशी, संजय सिंह, दुर्गेश पाठक, राखी बिडलान, एन. डी. गुप्ता उपस्थित होते.