वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला, तारेवर कपडे सुकत घालताना आधीच विद्युत्प्रवाहीत झालेल्या तारेतील विजेचा जोरदार धक्का बसल्याने वाळवा येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. वाळवा इस्लामपूर रस्ता मोहिते मळा शिवारात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रुद्रप्रताप युवराज गायकवाड (वय १९) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
घटनास्थळावरून व आष्टा पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार रुद्रप्रताप गायकवाड हा आपले आई-वडील, दोन बहीणी यांच्यासमवेत वाळवा-इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मला शिवारात राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो मोलमजुरी करायचा. तो पेट्रोलपंपावर काम करीत होता. रूद्धप्रतापचे वडील एका पाणीपुरवठा संस्थेमध्ये पाटकरी आहेत. मंगळवारी सकाळी कामावर जाण्याच्या लगबगीत त्याने आंघोळ केली आणि कपडे वाळत घालण्यासाठी तो घराच्या पाठीमागे तारेवर कपडे सुकत घालण्यासाठी घराच्या मागे गेला. कपडे सुकत घालण्यासाठी बांधलेली तार दुसऱ्या विद्युत प्रवाहीत तारेला चिकटल्यामुळे कपडे वाळत घालण्याच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह चालू झाला होता. कपडे सुकत घालताना रुद्रप्रतापला त्या तारेचा स्पर्श होऊन विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. विद्युत तारेचा झटका बसल्यानंतर आई आणि बहिणीने पाहिले आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आसपासचे लोक घटनास्थळावर दाखल झाले. त्याला इस्लामपूर येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणामध्ये त्याच्यावर वाळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. युवराज गायकवाड यांच्या एकुलत्या एक व तरुण मुलाचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.