पुणे / प्रतिनिधी :
घरात कोयता असावा की नसावा, यावरून पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून दोघांनी परस्परांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
मागच्या काही दिवसांपासून पुणे शहर व परिसरात कोयत्याने दहशत पसरविली आहे. अनेक टोळय़ांकडून हल्ल्यासाठी कोयत्याचा वापर करण्यात येत आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहेत. त्यात आता पती व पत्नीमध्ये कोयत्या ठेवण्यावरून वाद झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी सुवर्णा मुकेश राऊत व मुकेश अशोकराव राऊत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते राहत्या घरात असताना पत्नीने तुम्ही घरातला कोयता का विकत नाही, असा सवाल केला व या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने कोयत्याने वार करीत त्यांना जखमी केले व मारहाण केली, असे फिर्यादित म्हटले आहे. तर तो कोयता कुलकर्णी यांना द्या. अन्यथा, तो माझ्या कामात येईल, असे आपण म्हटल्याने पतीने चिडून जाऊन मारहाण केली व कोरत्याने वार करीत जखमी केले, असे सुवर्णाने आपल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. याबाबत बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.