Tarun Bharat

माळीनगर येथे ‘ज्ञानोबा – तुकाराम’ चा नामघोष करत उभ्या रिंगण सोहळ्यात वारकरी रंगले

विनायक बागडे/ श्रीपूर

दर्शनाची ओढ मनी, धाव घेई जो तो झणी ।
अश्व धावती रिंगणी, गजर माउली अंगणी ।
या अभंगाचा प्रत्यय माळीनगरमधील हजारो विठ्ठल भक्तांनी आज उभ्या रिंगण सोहळ्यात अनुभवला.
ज्ञानोबा-माऊली-तुकारामाचा जयघोष, टाळ मृदंगांचा गजर आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील पहिला उभा रिंगण सोहळा माळीनगर येथे मोठय़ा भक्तिमय वातावरणात पार पडला.

ज्ञानोबा-माऊली-तुकाराम आणि विठ्ठलाच्या गजरात दंग झालेला वैष्णवांचा मेळा अकलूज येथील एका दिवसाचा मुक्कामाचा निरोप घेऊन पुढे मार्गस्थ झाला आणि माळीनगरच्या भूमीत दाखल झाला. सकाळपासूनच माळीनगर आणि पंचक्रोशीतील हजारो वैष्णव रिंगण पाहण्यासाठी आतुर झालेले होते. रिंगण सोहळा सुरू होण्याआधी आणि नंतर जमलेले पुरुष आणि महिला वारकरी फुगडी, उंच उडी असे विविध खेळ खेळण्यात मग्न होते.

साधारणपणे आठच्या सुमारास माळीनगरमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येऊन विसावली. या वेळी आकाशात ढगांनी देखील गर्दी करायला सर्वात केली होती आणि पालखी सोहळ्यातील अत्यंत शिस्तबद्ध सुरुवातीला असणारा नगारखाना पुढे आला. त्याच्या पाठोपाठ स्वार असणारा आणि स्वार नसणारा अश्वदेखील आला. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात असणाऱया दिंडय़ा या रस्त्याच्या दुतर्फा विभागल्या गेल्या. संत तुकोबारायांचा रथ यांच्यामध्ये रांगोळीने तुकोबांच्या अश्वासाठी पायघडय़ा घालण्यात आल्या. यानंतर चोपदारांचा इशारा झाला. सुरुवातीला स्वार नसणारा तुकोबारायांच्या अश्वाने उभ्या रिंगणामध्ये धावण्यास सुरुवात झाली. त्याच्या पाठोपाठ स्वारधारी पताका घेतलेल्या अश्वाने देखील रिंगणामध्ये धावायला प्रारंभ केला. काही क्षणामधे दोन्हीही अश्व संत तुकाराम महाराजांच्या रथाजवळ गेले. यावेळी दोन्हीही अश्वांनी संत शिरोमणी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

या वेळी मानकऱयांनी त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार अर्पण केले. यानंतर परत एकदा अश्व हे उभ्या रिंगणामधून नगारखान्याकडे धावले. ज्ञानोबा-माउली- तुकाराम आणि विठ्ठलाच्या नामाचा जयघोष जसजसा वाढू लागला तसतसा तुकोबांचा अश्व वेगाने धावू लागला. टाळांचा आणि टाळ्यांचा कडकडाट, विठू माऊलीचा जयघोष अशा वातावरणात रिंगण सोहळा रंगून गेला. यानंतर संपूर्ण सोहळा हा माळीनगरच्या मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर विसाव्यासाठी थांबला व नंतर हा सोहळा आज बोरगाव मुक्कामी गेला. तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या अगदी जवळ येऊन पोहचली असल्याने आपल्या लाडक्मया विठूरायाचे दर्शन होणार आहे. त्या भेटीची आस वारकऱयांना लागली आहे.

Related Stories

सायकल रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

prashant_c

‘देशात कोरोनाच्या काळात भाजपने हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैशांचे वाटप ; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

Archana Banage

निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

datta jadhav

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर

Archana Banage

विराजस-शिवानीने बांधली लग्नगाठ

Kalyani Amanagi