जिल्हा पोलीसप्रमुखांची गोकाक धबधब्याला भेट : लोखंडी ग्रिल बसविण्यासाठी प्रशासनाला सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
वर्षा पर्यटनासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. रविवारी गोकाक फॉल्सवर धबधबा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सेल्फीच्या मोहापायी होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्वतः गोकाक फॉल्सला भेट देऊन अधिकाऱयांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅम किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा मोह अनेकांना होतोच. या मोहापायी काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलीसप्रमुखांनी पुढाकार घेतला असून पर्यटकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
स्थानिक अधिकाऱयांसमवेत रविवारी दुपारी जिल्हा पोलीसप्रमुखांनी गोकाक फॉल्सला भेट देऊन धोक्मयाच्या ठिकाणी पर्यटकांना सोडू नये, त्यांनी तेथे पोहोचू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशा सूचना केल्या आहेत. सध्या गोकाक फॉल्सला भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्याला ओढही खूप आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची गर्दी वाढते आहे.
काही तरुणाकडून हुल्लडबाजी
पाहणी केल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, रविवारी पर्यटकांची गर्दी होती. काही तरुण हुल्लडबाजी करीत होते. पाण्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः येथे आलो आहे. सध्या फिती बांधून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. लोखंडी ग्रिल बसविण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांशीही आपण चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
जीवघेण्या प्रकारांना पायबंद घालण्याच्या सूचना
यापूर्वी गोकाक धबधब्यावर सेल्फी घेताना अनेक जण धबधब्यात वाहून गेल्याची प्रकरणे घडली आहेत. एक तरुण तर खडकाच्या कपारीत 80 फूट खाली अडकून बसला होता. रविवारी गर्दीतील काही जण पाण्याच्या जवळ जात धोका पत्करून सेल्फी घेताना दिसत होते. अशा जीवघेण्या प्रकारांना पायबंद घालण्याच्या सूचना आपण पोलीस दलाला दिल्या आहेत, असे सांगितले.