प्रतिनिधी /खानापूर
जांबोटी ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी जांबोटी ग्रा. पं. सदस्यांनी तालुका पंचायत कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचा हा दुसरा दिवस होता. भ्रष्ट अधिकाऱयाला वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याने बुधवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला.
जांबोटी ग्रा. पं. सदस्य सोमवारपासून तालुका पंचायत कार्यालयासमोर विकास अधिकारी बन्नी यांची बदली व्हावी, म्हणून धरणे आंदोलनाला बसले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा सर्व पंचायत सदस्य धरणे आंदोलनास बसले. यावेळी जि. पं. सहाय्यक सेक्रेटरी हेगनायक व तालुका पंचायत अधिकारी यांनी आंदोलनाला बसलेल्या ग्रा. पं. सदस्यांशी चर्चा केली. नागाप्पा बन्नी यांना जांबोटी ग्राम पंचायतीतून बदली करण्यास नकार दिला. आपण यांना संधी द्यावी व चांगले काम करून घ्यावे, अशा सूचना केल्या. तसेच बन्नी यांना आपले वर्तन सुधारण्याची ताकीद देऊन कार्य करण्यास सांगू, मात्र सध्या बदली करता येणार नाही, असे सांगितल्यावर जांबोटी ग्रा. पं. सदस्यांनी जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन अजिबात मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. बुधवारपासून हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला.
या आंदोलनाला खानापूर तालुका म. ए. समितीने पाठिंबा दिला असून बन्नीसारख्या भ्रष्ट अधिकाऱयाला तालुक्यातून बाहेर घालवा, अशी मागणी माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अधिकाऱयांशी बोलताना केली. यावेळी यशवंत बिरजे म्हणाले, बन्नी यांची कार्यपद्धत अरेरावीची असून अनेक पंचायतीत त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत. याचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱयांनी बन्नी यांची तालुक्याबाहेर बदली करावी.
यावेळी मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, शिवाजी पाटील, रमेश धबाले, डी. एम. भोसले यासह समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा मयुरी सुतार, सदस्य सुनील देसाई, मंजुनाथ मुतगी आदी उपस्थित होते.