शिक्षण विभागाचे कारवाईचे आदेश : सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहणार
प्रतिनिधी/ बेळगाव
प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने सोमवार दि. 12 रोजी चलो बेंगळूरचा नारा दिला आहे. यामुळे शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा विचार करणाऱ्या शिक्षकांना सार्वजनिक शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला आहे. आंदोलनासाठी शाळा बंद ठेवणे हे कायद्याने चुकीचे असल्याने शाळा बंद ठेवता येणार नाहीत असा इशारा शिक्षण विभागाच्या आयुक्त बी. बी. कावेरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पीएसटी शिक्षकांवर अन्याय झाल्याचे कारण देत शिक्षकांनी आंदोलनाची हाक दिली. संपूर्ण राज्यातून प्रतिसाद मिळाल्याने सोमवार दि. 12 रोजी बेंगळूर येथील
फ्रीडम पार्क येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक शाळा शिक्षक बेंगळूर येथे जाणार असल्याने सरकारी शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. परंतु कर्नाटक राज्य नागरी सेवा नियम 2019 नुसार सरकारी कर्मचारी संप अथवा आंदोलनात कार्यालये बंद ठेवून सहभागी होऊ शकत नाहीत असे स्पष्ट केले आहे.
…तर नियमानुसार कारवाई
सोमवार दि. 12 रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहणार आहेत. तसे निर्देश शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. तरीदेखील शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाल्यास संबंधित मुख्याध्यापक, सहशिक्षकांवर नियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.