पर्वरी येथे आंदोलन केल्याप्रकरणासंबंधीचा खटला
प्रतिनिधी /मडगाव
म्हापसा येथील सिव्हील ऍण्ड क्रिमीनल कोर्टने राजकी नेत्या प्रतिमा कुतिन्हो आणि ऐश्वर्या साळगावकर यांच्याविरुद्ध मंगळवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
सुनावणीच्यावेळी न्यायालयात उपस्थित न राहिल्याच्या कारणास्तव न्यायालयाने वरील दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
पारा शिक्षकांना सरकारी सेवेत नियमीत करण्यात यावे यासाठी 2017 साली पर्वरी येथे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी प्रतिमा कुतिन्हो आणि ऐश्वर्या साळगावकर यांच्यासह सावित्री कवळेकर. स्मीता देसाई, रेश्मा प्रभू उर्फ श्रृती रावत देसाई आणि तृप्ती तिळवे यांच्यावरही भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 341, 332, 323, तसेच 149 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी 155/2017 क्रमांकाखाली एफआयआर नोंद केला होता.
पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी वरील संशयिताविरुद्ध म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. 24 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणी या न्यायालयात सर्वप्रथम सुनावणी झाली होती.
19 मार्च 2022 रोजी हा खटला न्यायालयात सुनावणीस आला तेव्हा संशयित आारेपी प्रतिमा कुतिन्हो न्यायालयात गैरहजर राहिल्याचे पाहून न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि यापुढील सुनावणी 14 जून रोजी निश्चित केली होती.
14 जून रोजी हा खटला सुनावणीस आला तेव्हा संशयित आरोपी प्रतिमा कुतिन्हो व ऐश्वर्या साळगावकर न्यायालयात गैरहजर असल्याचे पाहून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरट जारी करण्याचा आदेश दिला.
या पुढील सुनावणी आता 4 ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत या खटल्याचे कामकाज न्यायालयाने तहकूब केलेले आहे.
पारा शिक्षकांना राज्य सरकारच्या सेवेत कायम करुन घेण्यात यावे यासाठी 2017 मध्ये गोव्यातील पॅरा शिक्षकांनी पर्वरी येथे आंदोलन केले हाते. या आंदोलनाला वरील संशयित आरोपीनी पाठिंबा दिला होता आणि आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता असे न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटलेले आहे.