प्रतिनिधी /वास्को
मुरगाव पालिका कार्यालयात पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. या कार्यालयाचे संपूर्ण छत गळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी दशा झालेली आहे. याचा त्रास केवळ कार्यालयीन कर्मचाऱयांना नव्हे तर लोकांना अधिक होऊ लागलेला आहे. मागच्या वर्षीही हाच प्रकार या कार्यालयात घडला होता. मात्र, पालिकेने त्यातून धडाच घेतला नसल्याचे दिसत आहे.
मुरगाव पालिका इमारतीच्या सवर्धनाचे काम गेली दोन वर्षे चाललेले आहे. हे काम अजून एक वर्ष चालण्याची शक्यता आहे. इमारतीच्या छताचे जवळपास अर्धे काम पूर्ण झालेले आहे. या छताच्या कामाने मागच्या वर्षीही पावसाळय़ात पालिका कार्यालयावर संकट निर्माण केले होते. यंदाही तीच स्थिती आहे. हल्ली पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण कार्यालयात छतावरून पाऊस झिरपत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी दशा झालेली आहे. कार्यालयातील फाईल्स, साहित्य, विद्युत साहित्य व इतर दस्तऐवज धोक्यात आलेला आहे. कार्यालयातील कोणताही भाग सध्या पावसाच्या पाण्यापाचून सुरक्षीत राहिलेला नाही. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांची चिंता वाढलेली आहे. कर्मचाऱयांबरोबरच अधिक त्रास या कार्यालयात आपल्या कामांनिमित्त येणाऱया लोकांना होत आहे. या परिस्थितीमुळे सध्या लोकांची कामेही अडून राहिलेली आहेत. मागच्या पावसात घडलेल्या प्रकाराचा अनुभव पदरी असूनही पालिकेतील जबाबदार अधिकारी व नगराध्यक्षांनी त्यापासून कोणताच धडा घेतला नसल्याने पुन्हा तीच परिस्थिती या कार्यालयावर ओढवलेली आहे.
मात्र, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी पालिका कार्यालयात पाणीच पाणी अशी होण्याला केवळ पालिका इमारतीच्या संर्वधनाचे काम करणाऱयाला कंत्राटदाराला जबाबदार ठरवले आहे. पालिका कार्यालयाच्या छताचे काम हाती घेण्यापूर्वी दुसरी स्थलांतर करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते. मात्र, त्याने आम्हाला कोणतीच कल्पना न देता छताची कौले काढली. त्यामुळे पावसाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नगराध्यक्षांनी म्हटले आहे.