वाहनचालकांची कसरत, वेण्णालेक परिसर धुक्यात हरवला
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु असून येथील प्रसिद्ध वेण्णालेक तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव परिसर हा धुक्यात हरवला असून या संततधार पावसाने महाबळेश्वर- पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नरनजीक पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. वेण्णा नदीच्या ओसंडून वाहत आल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला होता. शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहावयास मिळाले. मंगळवारी रात्रभर धुवाँधार पाऊस कोसळत होता. बुधवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. मात्र शहरात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. मात्र पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते.
जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून महाबळेश्वरला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 01 जून ते 13 जुलै सकाळी 8.30 वाजेपर्यंत 2031.2 मिमी एकूण (80 इंच) पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु होती. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 148 मिमी (6 इंच) पावसाची नोंद झाली आहे.
मेटगुताड गावाजवळ 22 केव्ही ची विद्युत लाईनवर पडलेल्या झाडाच्या फांद्या एमएससीबी हटवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. जावली पुलाजवळ चोकअप झालेली मोरी तलाठी व कोतवाल यांनी स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला आहे. शिंदोळा येथे पुन्हा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेएसबीच्या साहाय्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरु करण्यात आला आहे. पार येथील शिवकालीन पुलासमोर लाकडे व कचरा जमा झाला होता त्या ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने साफसफाई करण्यात आली.