Tarun Bharat

भडकल गल्लीतील पाणीसमस्या गंभीर

एलऍण्डटी कंपनीचे साफ दुर्लक्ष : शहरातील विविध भागात दूषित पाणीपुरवठा

प्रतिनिधी /बेळगाव

भडकल गल्लीच्या मागील बाजूस दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन पंधरा दिवसांपूर्वी दोन ठिकाणी खोदाई करण्यात आली. पण दुरुस्ती करण्यात आलीच नाही. आठवडय़ापूर्वी एका ठिकाणी जलवाहिनी कापून एका बाजूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून याकडे एलऍण्डटी कंपनीने साफ दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

शहरातील विविध भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. भडकल गल्लीच्या मागील बाजूस दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने दुरुस्ती करून या समस्येचे निवारण करण्यात आले होते. मात्र एक महिन्यापूर्वी पुन्हा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी एलऍण्डटी कंपनीकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन दोन ठिकाणी खोदाई करून जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. पण दूषित पाणीपुरवठा कसा होत आहे. याची माहिती मिळाली नाही.

आठवडय़ापासून पाणीपुरवठा बंद

खोदाई करून पंधरा दिवस उलटले तरी दुरुस्तीचे काम अपुरेच आहे. तसेच दूषित पाणीपुरवठादेखील सुरू असल्याने नागरिकांनी पुन्हा याबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन एका ठिकाणी जलवाहिनी कापून गल्लीच्या पूर्वेकडील बाजूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एक आठवडय़ापासून या भागात पाणीपुरवठा होत नाही. पिण्याचे पाणी नसल्याने रहिवाशांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. परिसरातील कूपनलिकादेखील नादुरुस्त असल्याने पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. रस्ता अरुंद असल्याने टँकरही येवू शकत नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. येथील समस्येचे निवारण तातडीने करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वरिष्ट अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे : सलीमा खासगार

गेल्या पंधरा दिवसांपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. याकरिता दोन ठिकाणी खोदाई केली आहे. पण दुरुस्तीचे काम झालेच नाही. दुरुस्तीही नाही, पाणीही नाही, सांगा आता आम्ही कसे जगायचे. सातत्याने तक्रार करूनही एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. वरिष्ट अधिकाऱयांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करून सलीमा खासगार यांनी संताप व्यक्त केला.

दुरुस्तीचे काम तातडीने करा : ए. डी. विजापुरे

दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रस्त्यावर खोदाई करण्यात आली. पण दुरुस्तीचा पत्ताच नाही. खोदलेला खड्डा वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. तसेच परिसरातील पथदीप बंद असल्याने अंधार पसरलेला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राहत असताना पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने अडचण झाली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी इकडे-तिकडे धावपळ करावी लागत आहे. येथील कूपनलिकादेखील बंद असल्याने महिलावर्गाला खूपच त्रास होत असून दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी ए. डी. विजापुरे यांनी केली.

दूषित पाण्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात : अनिसा जमादार

दूषित पाण्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. सातत्याने तक्रार करूनही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. सुरू असलेला पाणीपुरवठादेखील आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता पाणी कुठून आणायचे? असा मुद्दा अनिसा जमादार यांनी उपस्थित केला.

Related Stories

क्रॉसकंट्री स्पर्धेत प्रमोद, लक्ष्मण, साईश्री, संदीप, रंजिता, सुरेश देवरमनी विजेते

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या कोरोना तपासणीचा घोळ कायम

Omkar B

कोकटनूर यल्लम्मा यात्रेत प्राणीहत्या रोखण्यात यश

Patil_p

कोल्हापूर चॅलेंजर संघ विजयी

Amit Kulkarni

यल्लम्मा देवस्थानतर्फे पुजाऱयांना किट

Amit Kulkarni

शेतकऱयांना दहशतवादी म्हणणाऱया कंगणाविरोधात तक्रार

Amit Kulkarni