Tarun Bharat

शहरात पाणी समस्या दिवसागणिक तीव्र

पाणीपुरवठय़ामध्ये सुरळीतपणा आणण्यात एलऍण्डटी असमर्थ : सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’, अशी म्हण आहे. बेळगावच्या बाबतीत एलऍण्डटीच्या कारभारामुळे ‘जलाशयात भरपूर पाणी, पण नळाला थेंबही नाही’ अशी परिस्थिती बेळगावकरांवर ओढवली आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.

पावसाने शहराची दैना केली किंवा दाणादाण उडविली तरी एका अर्थाने जलाशयांना त्याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाई उद्भवण्याचे कारणच नाही. तथापि, केवळ एलऍण्डटीच्या कारभारामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे.

शहराच्या बहुसंख्य भागामध्ये अद्यापही पाणी येत नसून पहाटेपासून पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये महिलांचा वेळ वाया जात आहे. एलऍण्डटीने पाणीपुरवठा जरी केला नसला तरी आमच्या झोपेचे मात्र खोबरे केले, अशा प्रतिक्रिया महिलावर्गातून उमटत आहेत. मुख्य म्हणजे पाणी येण्याची वेळ कोणत्याच भागामध्ये निश्चित नाही. पाणीपुरवठय़ात व्यत्यय असे पत्रक दिल्यानंतर खरे म्हणजे एलऍण्डटीची जबाबदारी संपत नाही.

मात्र केवळ पत्रक प्रसिद्धीस देऊन सुरळीत पाणीपुरवठा कधी होणार आणि त्याची वेळ काय? हे सुद्धा एलऍण्डटीने स्पष्ट करायला हवे. सोमवारपेठ, मंगळवारपेठसह टिळकवाडी परिसरात पाण्याची इतकी बारीक धार आहे की फक्त छोटा तांब्या भरण्यासाठी एक तास वाया जातो, असे महिलांचे म्हणणे आहे. शहापूर, वडगाव भागातही याहून वेगळी परिस्थिती नाही.

टँकरचे दरही भरमसाट

टिळकवाडी, वडगाव, अनगोळ, शहापूर या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, टँकरचे दरही भरमसाट वाढले आहेत. मनपा टँकरने पाणी देईल, असे सांगण्यात येते. परंतु हे पाणी नेमके कोठून आणले जाते, अशी शंका घेऊन नागरिक त्याला फारसा प्रतिसाद देत नाहीत. एकूणच पाणीपुरवठय़ामध्ये सुरळीतपणा आणण्यात एलऍण्डटी असमर्थ ठरत आहे. पाणी असूनही त्याचे योग्य नियोजन कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

स्टेशन रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

सरकारचा गिरीराज कोंबडय़ांचा पर्याय ठरला फोल

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक मराठी शाळा एसडीएमसी निवड

Amit Kulkarni

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

Amit Kulkarni

शहर स्वच्छता आराखडय़ातील त्रुटी दूर करण्याची सूचना

Amit Kulkarni

परवानगी असली तरी मांस विक्रीची दुकाने बंदच!

Patil_p