विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचे आश्वासन : हलगा ग्रामपंचायतला दिली भेट : विधानसभेत मुद्दा मांडणार
वार्ताहर /किणये
सुवर्ण विधानसौधजवळील हलगा-बस्तवाड गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नळांना चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. हलगा गावातील महिला सुवर्ण विधानसौधवर पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत होत्या, असा इशाराही त्यांनी दिला होता. याच परिस्थितीत मंगळवारी सुवर्णविधानसौध हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी हालगा ग्रा.पं.ला भेट देऊन दोन्ही गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
सुवर्णविधानसौध बांधण्यासाठी हालगा-बस्तवाड गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. यावेळी दोन्ही गावातील तरुणांना नोकरी देणार, तसेच गावात पाण्याची व्यवस्था करून देऊ, प्रशासनाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार, असे गावकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षापासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सुवर्ण विधानसौधला आपली जमीन देऊनही आम्ही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहोत, अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या.
हलगा गावातील नळांना पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी महिला गावात एकत्र जमून त्यांनी सुवर्ण विधानसौधवर घागर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता.
सुवर्ण विधानसौधजवळील स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून व त्यांच्या समस्या सोडविण्याच्या हेतूने सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी हलगा ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी गावासाठी विधानसौधला गेलेल्या पाईपलाईनमधून दोन इंच पाणी देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडतो, असे सांगितले आहे. यामुळे दोन्ही ग्रामपंचायतमधील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सभापती विश्वेश्वर हेगडे यांचा ग्रामपंचायतचे अध्यक्ष सदानंद बिळगोजी व उपाध्यक्षा सुजाता सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष गणपत मारीहाळकर व सदस्य सागर कामनाचे, पिराजी जाधव, तवण्यापा पायाका, विलास परीट व इतर सदस्य, पीडीओ, सेक्रेटरी उपस्थित होते.