Tarun Bharat

आडपई गावात उसळल्या आनंदोत्सवाच्या लाटा..!

पाच दिवसांची विसर्जन मिरवणूक थाटात : चित्ररथ देखावे, दिंडी, फुगडय़ा, गणरायांचा अखंड जयघोष

प्रतिनिधी /फोंडा

 गणरायांचा अखंड जयघोष… पारंपरिक वाद्यांचा गरज…आकर्षक देखावे आणि भक्तांच्या उत्साहाला आलेले उधाण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात आडपई ग्रामस्थांनी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेली आडपई गावातील पाच दिवसांची ही गणपती विसर्जनाची मिरवणूक काल रविवारी सायंकाळी थाटात पार पडली. जुवारी नदीच्या काठावर वसलेले आडपई गांव जणू दोन तास आनंदोत्सवाच्या लाटांवर स्वार व्हावे, असाच हा एकंदरीत माहोल होता.

 देवदेवतांच्या प्रतिकृती, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे चित्ररथ देखावे…. फुगडय़ा, दिंडी आणि गणपती बाप्पांचा अखंड जयघोष….अशा उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी निरोप देण्यात आला. दुपारी 4 वा. मिरवणुकीला सुरुवात झाली व दोन तास अखंड जल्लोषात संपूर्ण गाव बुडून गेले. गावातील लहान थोरांबरोबरच सग्या सोयऱयांनीही या मिरवणुकीत सहभागी होऊन आनंदाचे काही क्षण अनुभवले. गावातील प्रत्येक कुटुंबातील गणपतीची उत्तरारती झाल्यानंतर सर्व गणपती आपल्या ठरलेल्या क्रमानुसार मिरवणुकीत सहभागी झाले. दत्त मंडपाजवळ सर्व गणपती एकत्र आल्यानंतर सामूहिक आरती व नंतर जुवारी नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले.

 आडपई गावातील पाच दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजे केवळ फोंडा तालुकाच नव्हे, संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. फोंडा तालुक्यातील गणपती उत्सवातील ती खास आकर्षण बनून राहिली आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही आगळी वेळगी परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे.

 प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गावातील सर्व पंधरा-सोळा कुटुंबियांनी आकर्षक असे देखावे तयार करुन त्यात आपल्या गणरायाला विराजमान करीत वाजत गाजत निरोप दिला. आकर्षक अशा देखाव्यातून गावातील कलाकारांच्या कलेचे दर्शन घडले. तरुणवर्गाचा उत्साह तर ओसंडून वाहताना दिसला. विविध देवदैवते तसेच ऐतिहासिक पुरुषांच्या प्रतिकृतींवर आधारीत देखाव्यांसह यंदा भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव असल्याने राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत देखावेही या मिरवणुकीत पाहायला मिळाले.

 आडपई गावात पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा आहे. नवीन पिढीनेही ती कायम राखली आहे. याची प्रचिती मिरवणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणातून दिसून आली. या गावात घरोघरी गणपती पुजले जात नाहीत. सर्व कुटुंबियांकडून एकत्रित गणपती पुजण्याची प्रथा आहे. त्यात खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, मधले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास आदी कुटुंबाचा समावेश आहे. यंदा या सर्व कुटुंबीयांनी चित्ररथ देखावे तयार करुन दिंडी मिरवणुकीसह मोठय़ा थाटात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गोव्याच्या विविध भागातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

Related Stories

तळेवाडा बेतकी शाळेच्या शेड, रंगमंचाचे उद्घाटन

Amit Kulkarni

गिरी येथे शिवनाथ स्वामीची 18 रोजी पुण्यतिथी

Amit Kulkarni

विजेच्या धक्क्याने द्यार्थ्याचा मृत्यू

Patil_p

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

Patil_p

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar

एजींच्या सल्ल्यानंतर निवडणुकीचा फैसला

Patil_p
error: Content is protected !!