मेक्सिकोचे पर्यटनमंत्री : मिगुएल टोरूको माकुस
प्रतिनिधी /पणजी
53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आपल्या सर्व प्रतिनिधींसाठी एक आकर्षक मेक्सकिन मेजवानी तयार केली आहे. या महोत्सवात विविध श्रेणींमध्ये मेक्सिकोचे अनेक चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. मेक्सिकोचे पर्यटन मंत्री मिगुएल टोरुको माकुस यांनी एका व्हिडिओ संदेशात आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा अत्यंत महत्त्वाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करणे हा माझा सन्मान आहे. मेक्सिका त्याच्या वैशिष्टय़पूर्ण संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. आणि आमचा सिनेमा या वारशाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आमच्या देशात अनेक महान चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत, ज्यांना दिग्गज मानले जाते. जगभरात आमच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाची अभिव्यक्ती म्हणून मेक्सकिन सिनेमाचा जन्म झाल्याचे त्यांनी नमूद केले.
“मेक्सकिन सरकारने सिनेमासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे , ज्या अंतर्गत ते आमच्यासारख्या दर्जेदार चित्रपटांना प्रोत्साहन देतात. सरकारी प्रोत्साहनाशिवाय अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करणे कठीण आहे कारण व्यावसायिकदृष्टय़ा ते परवडत नाही.’’ते पुढे म्हणाले की, विवाह सोहळा या संकल्पनेवर भारताबरोबर संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याचा ते विचार करत आहेत .“आम्ही खरे तर विवाह सोहळा या संकल्पनेवर संयुक्तपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही देशांमधले विवाहसोहळे भव्य आणि रंगतदार असतात आणि ते बरेच दिवस चालतात. या प्रकारच्या सांस्कृतिक समानतेमुळे भविष्यात आणखीही प्रकल्प गती घेऊ शकतात.